समीर इनामदार सोलापूर: अचानक येणारा पाऊस, होणारी गारपीट तसेच वातावरणातील बदलांमुळे पिकांचे होणारे नुकसान यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी भांबावला असून, होणाºया परिणामांचा वेध घेण्यासाठी प्रभावी यंत्रणांची गरज निर्माण झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हा कालावधी पावसाचा आहे. त्याशिवाय आॅक्टोबर ते डिसेंबर या काळातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडतो. मात्र आता कोणत्याही महिन्यात पाऊस पडू शकेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्याशिवाय हवामानात बदल झाल्याने सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी पाऊस अशी विचित्र स्थितीही सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे या बदलत्या हवामानात कोणते पीक घ्यावे किंवा या बदलाचा आरोग्यावर होणारा परिणाम याचा अभ्यास आता करावा लागणार आहे.
राज्यात हवामान बदलाचा स्वतंत्र विभाग आहे. त्याशिवाय उपग्रह, संगणकाचा वापर करूनही शेतकºयांना त्याचा फायदा होताना दिसत नाही. अशा स्थितीत शेतकºयांनी कोणते वाण घ्यावे?, कोणत्याही वातावरणात टिकणारे बी-बियाणे संशोधित होत आहेत, त्याचीही माहिती मिळत नाही, ही अनेक शेतकºयांची खंत आहे.
२०३० पर्यंत सर्वसाधारणपणे ०.५ अंश इतके तापमान वाढेल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. अर्थात हवामान बदल होतो आहे किंवा नाही, याबाबत शास्त्रज्ञात दुमत आहे. काहींच्या मते ठराविक कालावधीनंतर असे बदल होत राहतात आणि हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे, याचा बाऊ करण्याचे काही कारण नाही. सोलापूरचे तापमान ४५ अंशांपर्यंत जाणे हे १५० वर्षांपासून सुरूच आहे. अलीकडच्या काळातच केवळ तापमानात वाढ झाली आहे, हे म्हणणे देखील तितके खरे नाही.
जगभरात पृथ्वीचे तापमान, वातावरण, हवामानाच्या प्रत्यक्ष नोंदी या १८५० पासून उपलब्ध आहेत. १९०६ ते २००५ या काळात तापमान ०.७४ अंशाने वाढले आहे. तर १९९६ ते २००८ या १२ वर्षांपैकी ११ वर्षे उष्ण तापमानाची म्हणून गणली गेली. २०१६ आणि २०१७ ही वर्षे सर्वाधिक उष्ण वर्षे म्हणूनही ओळखली जातात. हवामान बदलामुळे २०२० सालापर्यंत जगभरात २५ कोटी लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. काही देशात कृषी उत्पन्न वाढेल तर काही देशात ते कमी होईल. गारपीट, दुष्काळ, महापूर, विजा कोसळण्याचे प्रमाण वाढेल, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सोलापूरचे नुकसान- २०११, २०१४, २०१६, २०१७ या वर्षात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकºयांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. दरवर्षी अशा नुकसानीमुळे शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे. अवकाळी पावसाविषयी अगोदरच कल्पना आली तर हे नुकसान कमी होईल. शासनाने प्रभावी यंत्रणा स्थापन करण्याची यानिमित्ताने गरज निर्माण झाली आहे.