सोलापूर : कोरोना पुन्हा डोक वर काढत अससल्याने परराज्यांतील कांदा खरेदीवर मोठा परिणाम झाला असून, गेल्या पाच दिवसांपासून दरात घसरण सुरू आहे.
राज्यात कोरोनाचे संकट मागील वर्षी याच कालावधीत आले होते. त्यामुळे कांदा उत्पादकासह इतर शेतीमालाचेही नुकसान झाले होते. याहीवर्षी हीच वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियम पाळण्याचे आवाहन केल्यानंतर हळूहळू शेतीमालाचे भाव पडण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात प्रति क्विंटलचा पाच हजारपर्यंत गेलेला भाव चार दिवसांनंतर अडीच हजार रुपयांवर आला आहे. राज्याबाहेर जाणारा कांदा खरेदी व्यापाऱ्यांनी थांबविल्याचे कारण सांगितले जाते.
सोलापूरबाजार समितीत आलेल्या संपूर्ण कांद्याची खरेदी व्यापारी करतात; पण दररोज दरात घसरण केली जाते. कोरोनामुळे अचानक संचारबंदी लागू होईल; मग घेतलेल्या कांद्याची विक्री कशी करायची? असा प्रश्न खरेदीदार विचारत आहेत. त्यातच शनिवारी स्थानिक नागरिकांनी बाजार समितीत भाजीपाला, फळे व इतर शेतीमालाची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केल्याने दरात आणखीन घसरण झाली.
---------------
अशी झाली दराची घसरण...
- 0 सोलापूर २३१ ट्रक २३,१३० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. सर्वाधिक ४६५० रुपये, तर सरासरी तीन हजाराचा दर मिळाल्याने ६ कोटी ९४ लाख रुपयांची उलाढाल झाली होती.
- 0 मंगळवारी २२३ ट्रकमधून आलेल्या कांद्याचे २२,३१५ क्विंटल वजन आहे. सर्वाधिक प्रति क्विंटल ४७५० रुपये, तर सरासरी २८०० रुपये दर मिळाल्याने उलाढाल ६ कोटी २५ लाख रुपये झाली.
- 0 बुधवारी २०१ ट्रकमधून २० हजार १८९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती व सर्वाधिक प्रति क्विंटल ४७०० रुपये, तर सरासरी २७०० रुपये दर मिळाला. पाच कोटी ४५ लाख रुपये उलाढाल झाली.
- 0 गुरुवारी २५४ ट्रकमधून आलेल्या कांद्याचे २५ हजार ४३८ क्विंटल वजन झाले. सर्वाधिक दर प्रति क्विंटलला ३६२५ रुपये, तर सरासरी २२०० रुपये मिळाला. एकूण उलाढाल ५ कोटी ५९ लाख ६४ हजार रुपये झाली.
- 0 शुक्रवारी २८२ ट्रकमधून २८,२०३ क्विंटल कांद्याची आवक झाली. सर्वाधिक दर प्रति क्विंटलला ३२५० रुपये व सरासरी १७०० रुपये मिळाल्याने चार कोटी ७९ लाख ४५ हजार रुपयेइतकीच उलाढाल झाली.
- 0 शनिवारी २४६ ट्रकमधून २४,६७१ क्विंटल कांद्याची आवक झाली. सर्वाधिक दर प्रति क्विंटलला तीन हजार, तर सरासरी १७०० रुपये मिळाल्याने उलाढाल चार कोटी १९ लाख ४० हजार रुपयेइतकी उलाढाल झाली.