मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरातील विठ्ठल पूजेला येणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे यंदा विठ्ठलाची पूजा कोण करणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, या वर्षी आषाढी एकादशीनिमित्त आयोजित पांडुरंगाची पूजा 'मानाचे वारकरी' करतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच पालकमंत्री आणि जिल्हाधिकारीही या पूजेला उपस्थित राहतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात वारीची परंपरा 700 वर्षांपासून आहे. या वारी परंपरेला छत्रपती शिवाजी महाराज यांनीही सरंक्षण दिले होते. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र, या पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात येऊ देणार नसल्याची भूमिका मराठा समाजातील आंदोलकांनी घेतली आहे. त्यानंतर, पंढरपूरमधील वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन मी विठ्ठल पूजेला जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच मी पूजेला जाणार नाही, पण माझ्या घरी विठ्ठलाची पूजा करेन, असेही फडणवीस यांनी म्हटले. त्यानंतर, आता पूजेचा मान कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर, जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्र्यांच्याहस्ते ही पूजा संपन्न होईल, असे काहींनी म्हटले होते. मात्र, यंदा विठ्ठलाची शासकीय महापूजा मानाचे वारकरीचं करतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पूजेचा मान कोणाला हा चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, यापूर्वी 1996 साली मनोहर जोशींना शासकीय पूजेसाठी रोखण्यात आले होते. त्यावेळी, राज्याच्या मुख्य सचिवांना या पूजेचा मान मिळाला होता.