राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यानिमित्त वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी खा. शरद पवार आले होते. त्याचबरोबर अनेक भाजपसह इतर पक्षांच्या नेत्यांनीही विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. शनिवार, दि. २६ जून रोजी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन यांचा विवाह डॉ. स्नेहल पाटील यांच्याशी पार पडला. या विवाहासाठी दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार विवाहस्थळी दाखल झाले. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्वागत करत खा. शरद पवार यांना विवाहस्थळी आणले.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, आ. बबनराव शिंदे, आ. संजय शिंदे, माळी शुगरचे कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे, आ. यशवंत माने, माजी आ. दीपक साळुंखे-पाटील, उमेश पाटील, फत्तेसिंह माने-पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, पांडुरंग माने-देशमुख, माजी उपसभापती मच्छिंद्र ठवरे, शिवाजीराजे कांबळे, जि.प. सदस्य बाळासाहेब धाईंजे, अजय सकट यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते.
तालुक्यात जानकरांना राजकीय बळ देणार
खा. शरद पवार विवाहस्थळी गाडीतून उतरले, तेव्हा उत्तमराव जानकर हे स्वागतासाठी पुढे गेले. त्यावेळी शरद पवार यांनी त्यांचा हात धरून त्यांना सांगितले की, माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची फळी मजबूत करा. राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला राजकीय बळ देण्याचे काम करेल. सतत तुमच्या पाठीमागे राहील. जवळपास शरद पवार यांनी जानकारांसाठी ४० मिनिटे वेळ राखून ठेवला होता.
अकलूजमधील उपोषणाकडे कानाडोळा
अकलूज नगर परिषद व नातेपुते नगर पंचायत व्हावी म्हणून साखळी उपोषण चालू आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. खा. शरद पवार माळशिरस तालुक्यात आल्यानंतर यावर काय भाष्य करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते; पण पवार यांनी अकलूज उपोषणाकडे कानाडोळा करत काहीच भाष्य केले नाही.
भाजप नेत्यांची हजेरी
जानकर परिवारातील विवाह सोहळ्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, आ. समाधान आवताडे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.