अरुण बारसकर सोलापूर: सोलापूरबाजार समितीमध्ये यावर्षी कांद्याची आवक ९ लाख ३७ हजार क्विंटलने वाढली आहे. मात्र दराची घसरण सुरुच राहिल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास ३०० कोटींची उलाढाल घटली आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये राज्यातून तसेच राज्याबाहेरील ५४ तालुक्यातील कांदा विक्रीसाठी येतो.
राज्यातील नाशिक जिल्ह्यातील काही बाजार समितीप्रमाणेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीही कांदा उलाढालीत अग्रभागी आहे. यावर्षी राज्यभरातून तसेच बाहेरच्या राज्यातूनही सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आला. यामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी कांद्याची आवक वाढली आहे. त्याचवेळी दरात मोठी घसरण झाल्याने बाजार समितीच्या उलाढालीत मोठी घट झाली तर शेतकºयांना कांद्यातून नुकसान सहन करावे लागले.
राज्यातील विविध भागातून कांदा विक्रीसाठी आला. वाहतुकीसाठीचा मोठा खर्च शेतकºयांना सोसावा लागला. कांद्याची प्रत चांगली असली तरी दोनशेपासून पाचशे रुपयांचा दर मिळाला. यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. दुष्काळ आणि कांद्याचा पडलेला भाव यामुळे नेहमीच गृहिणींच्या डोळ््यात पाणी आणणाºया कांद्याने यंदा मात्र शेतकºयांच्या डोळ््यात पाणी आणले.
अनुदान जाहीर अन् दरात घट- नोव्हेंबरपासून कांदा दरात सुधारणा झाली नाही. उलट घटच झाल्याने राज्य शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले. अनुदान देण्याची घोषणा होताच बाजारात कांद्याच्या दरात आणखीन घट झाली. उच्च प्रकारच्या कांद्याला पाचशे ते ७०० रुपये असलेला दर अनुदान जाहीर केल्यानंतर तीनशे ते पाचशेवर आला. त्यानंतर यातही घसरणच झाली.
सोलापूर बाजार समितीमधील आवक आणि उलाढालवर्ष कांदा(क्विंटल) उलाढाल(रुपयात)
- २०१४-१५ ५३ लाख ३२ हजार ४९८ कोटी ९७ लाख
- २०१५-१६ ४५ लाख ९६ हजार ५३४ कोटी ४१ लाख
- २०१६-१७ ४७ लाख २७ हजार २४० कोटी १५ लाख
- २०१७-१८ ४८ लाख ५० हजार ६२४ कोटी ३९ लाख
- २०१८-१९ ५७ लाख ८७ हजार ३३२ कोटी ७६ लाख
मलेशिया, सिंगापूर व इतर राष्टÑांना पाकिस्तानने चांगल्या प्रतीचा व कमी दराने कांदा पुरवला. आपल्याकडे एकाच वेळी व दुय्यम प्रतीचा कांदा बाजारात आला. सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक यावर्षी १३० टक्के झाली. कांद्याची निर्यातही झाली परंतु अधिक उत्पादनामुळे दरात वाढ झाली नसावी.- सिद्रामप्पा हुलसुरे, कांदा व्यापारी, सोलापूर बाजार समिती