पटवर्धन कुरोली : वाखरी, भंडीशेगाव (ता. पंढरपूर) परिसरात भीषण दुष्काळामुळे विहिरी, बोअर कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांची ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष, कडवळ, मका आदी पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. पिण्याच्या पाण्याचीही भीषण टंचाई जाणवू लागली आहे. घागरभर पाण्यासाठी नागरिकांना मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडून टँकर सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी तो येतो कधी आणि कुणाला पाणी देतो. याची अनेक ग्रामस्थ, शेतकºयांना माहितीच नाही. प्रशासन याविषयी गंभीर दिसत नसल्याने शेतकरी ग्रामस्थ धास्तावले आहेत.
मागील वर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस, कॅनॉलच्या पाण्याचे कोलमडलेलं नियोजन यामुळे वाखरी, भंडीशेगाव परिसरातील भूजलपातळी कमालीची खालावली आहे. ५०० फूट खोल बोअर, विहिरीही पूर्ण कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकरी, नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वाखरी, भंडीशेगाव परिसरात उसाचे क्षेत्र कमी असले तरी कमी पाण्यावर येतील अशा डाळिंब, केळी, द्राक्ष अशा फळबागा, कडवळ, मका अशी चाºयाची पिके व भाजीपाल्याची लागवड शेतकºयांनी ठिबक सिंचनावर केली होती; मात्र जिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असेल तिथे ठिबकद्वारे पिकांना कुठून पाणी येणार अशी परिस्थिती आहे. ऐन उन्हाळ्यात अनेक शेतकºयांनी डाळिंब बागा जोपासल्या. त्या बागांना फळेही चांगली आली; मात्र ती फळे विक्रीयोग्य होण्याअगोदरच पाण्याअभावी अख्ख्या बागाच जळून खाक होत आहेत. ऊस व इतर पिकांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळं शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
कवडीमोल किमतीला दुभत्या जनावरांची विक्री- वाखरी, भंडीशेगाव या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी विहीर व बोअरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. कॅनॉलला पाणी आले तरच विहीर, बोअरची पाणी पातळी समान राहते. यावर्षी पाण्याचे नियोजन कोलमडल्याने विहीर, बोअरच्या पाण्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात दूध व्यवसायावर अनेक शेतकºयांचे अर्थकारण चालते; मात्र जनावरांना हिरवा चारा मिळणे अवघड झाल्याने अनेक शेतकºयांनी आपली दुभती जनावरे कवडीमोल किमतीला विकून टाकली आहेत. दूध व्यवसायही धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकºयांचे अर्थकारण पूर्ण कोलमडले आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करणे, वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करणे गरजेचे आहे. मात्र प्रशासन याविषयी फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिक शेतकºयांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्लॉट एरिया परिसरात पाण्याचा टँकर सुरू करावा- वाखरी प्लॉट एरिया इसबावी परिसरात मोठी लोकवस्ती आहे. या परिसरात नगरपालिका व वाखरी ग्रामपंचायतीतर्फे कोणतीही सार्वजनिक पाणीपुरवठ्याची सोय नाही. अनेक नागरिकांच्या स्वत:च्या मालकीच्या बोअर आहेत. बहुतांश त्या सर्व बोअरच्या पाण्याने तळ गाठला आहे. तर काही बोअर पूर्ण बंद पडल्याने पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू आहे; मात्र याकडे पंढरपूर नगरपालिका, वाखरी ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने नागरिकांवर पाण्यासाठी स्थलांतर करण्याची वेळ येऊ लागली आहे. या परिसरात प्रशासनाने पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
नुकसानभरपाई द्या- वाखरी, भंडीशेगाव परिसरातील शेतकºयांची उभी पिके पाण्याअभावी जाळून शेकडो कोटींचे नुकसान झाले आहे. अशा जळालेल्या पिकांचे पंचनामे करून फळबागा, ऊस यासह चारा, भाजीपाला पिकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.