संतोष आचलारे सोलापूर : लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रत्येक गावात, वॉर्डातील नेतेमंडळींचा उत्साह तर वाढलाच आहे; पण कपडे शौकिनही आता निवडणुकीच्या हंगाम सुरू असल्याची संधी घेत जॅकेट खरेदी करीत आहेत. चेरी, बदामी व निळ्या रंगाच्या जॅकेट खरेदीला कार्यकर्त्यांची अधिक पसंती मिळत असल्याची माहिती जॅकेट विक्रेत्यांनी दिली. जॅकेटसाठी खादी कापड घेऊन ते शिऊन घेण्यात वेळ घालविण्यापेक्षा रेडिमेड चार ते पाच हजार रुपयांतील खादी जॅकेट खरेदीकडे पसंती मिळत आहे.
सोलापूर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावातील व शहरातील वॉर्डातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाºयांच्या भेटीगाठी घेणे उमेदवारांकडून सुरु आहे. उमेदवारासमोर आपली छाप पडावी यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते पारंपरिक पांढरी असणारी वेशभूषा बदलून पांढºया वेशभूषेला जॅकेटचा आधार देताना दिसून येत आहेत.
दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही जॅकेट घालण्याची आवड होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॅकेटची क्रेझ वाढविली. अलीकडच्या पाच वर्षांत जॅकेट घालण्याची परंपराच निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या काळात आपली वेगळी छाप मतदारांवर पडावी यासाठी नेतेमंडळींसह पदाधिकारी व कार्यकर्तेही जॅकेट घालत आहेत.
सोलापुरात रेडिमेड जॅकेट विक्री सध्या जोमात होत आहे. साधारणपणे पाच हजार रुपये किमतीच्या जॅकेट खरेदीकडे कल दिसून येत आहे. यात विविध प्रकारचे रंग निवडण्याचा पर्याय आहे. काही कार्यकर्ते सातशे ते नऊशे रुपये मीटरप्रमाणे जॅकेटसाठी कापड खरेदी करीत आहेत. जॅकेट शिऊन देणाºया टेलरची संख्याही वाढली आहे. यासाठी बाराशे ते दीड हजार रुपये शिलाई दर घेण्यात येत आहे.
जॅकेटचा वापर सर्वत्र : चेतन गंगनहळ्ळी
- - सोलापुरात काही दिवसात जॅकेट खरेदी करणाºया ग्राहकांची संख्या वाढली आहे. शुभकार्य व निवडणुका अशाप्रसंगी वापरता येणाºया जॅकेट खरेदीला ग्राहकांची पसंती दिसून येत आहे. रंगीत व खादी असणाºया पाच हजार रुपयांपर्यंतच्या जॅकेटलाही प्राधान्य मिळत असल्याची माहिती व्यावसायिक चेतन गंगनहळ्ळी यांनी दिली.
रंग निवडण्यासाठी भरपूर पर्याय
- - जॅकेटसाठी खादी कापड घेऊन ते शिऊन घेण्याकडे कल काही ग्राहकांचा आहे. विविध रंगाचे कापड जॅकेटसाठी उपलब्ध होत असल्याने ग्राहकांसमोर रंगांमध्ये भरपूर पर्याय असल्याची माहिती पार्क चौकातील खादी कापड दुकानदारांनी दिली.
- लाईट कलरलाही मिळतेय पसंती
-निळा, चेरी, हिरवा, काळ्या यासारख्या रंगांतील जॅकेट शिऊन घेण्याचा कल ग्राहकांचा आतापर्यंत होता. मात्र काही महिन्यांपासून लाईट कलरमधील खादी कापड आणून जॅकेट शिऊन घेण्याचा कल दिसून येत असल्याची माहिती जॅकेट शिवणारे टेलर संजय सुलाखे यांनी दिली.