राकेश कदमसोलापूर : गेल्या अडीच वर्षांपासून रेंगाळलेले एलईडी दिव्यांचे काम मंजुरीच्या टप्प्यावर आले. परंतु, ‘प्रकाशाची टक्केवारी’ निश्चित न झाल्याने त्याला ‘ब्रेक’ लावण्यात येत असल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात रंगली आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून शहरात ४० हजार एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. महापालिकेतील मोठी कामे टक्केवारीशिवाय मार्गी लागत नाहीत, असा लोकांचा अनुभव आहे. भुयारी गटार योजनेच्या निविदा प्रक्रियेत एका नेत्याला ‘अमृत’ मिळाल्याची चर्चा बºयाच दिवसांपासून सुरू आहे. एलईडीच्या कामातही असाच ‘प्रकाश’ पडेल, अशी अनेकांना आशा आहे. त्यामुळे प्रशासनाने कर्नाटका कंपनीला मंजूर केलेली निविदा कशी चुकीची आहे, यावर मोठा गोंधळ घालण्यात आला. अखेर प्रशासनाने नमते घेत शासनाच्या नियमानुसार ईईएसएल कंपनीला हे काम देण्याची तयारी दर्शविली.
इथपर्यंत सगळे ठीक झाले. पण एवढा गोंधळ करूनही हाती काहीच नाही. त्यामुळे एलईडी दिव्याचा प्रकाश मोजण्याची तयारी झाली. त्यासाठी सुरतेवर स्वारी करण्यात आली. तेथील सर्व माहिती घेतल्यानंतरही काही मुद्दे उपस्थित करून आयुक्तांसोबत बैठक घेऊन यावर निर्णय घेणार, असे पदाधिकाºयांनी घोषित केले. या राजकारणात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अंधारातच गेला. आता दिवाळी तोंडावर असताना एकमेकांकडे बोट करीत ईईएसएलच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
एलईडी बसविण्याच्या कामासोबतच शहर व हद्दवाढ भागात नव्याने विजेचे खांब व इतर तांत्रिक कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यासाठी साधारणत: १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही कामे देण्याचे ‘गाजर’ प्रशासनातील काही अधिकाºयांनी काही नेत्यांना दाखविले होते. आता एलईडीच्या कामाला मंजुरी देण्याची वेळ आली तरी या गाजराबद्दल प्रशासन बोलायला तयार नसल्याने नवा खल सुरू झाल्याची चर्चा आहे.
झोपेचे सोंग घेतले तर मी काय करू - आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे म्हणाले, ईईएसएल या कंपनीला वीज बिल बचतीच्या पैशातूनच हप्त्याने पैसे द्यायचे आहेत. जिथे स्वतंत्रपणे खांब उभारायचे आहेत त्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून पैसे दिले जाणार आहेत. सदस्यांना सर्व गोष्टींची माहिती आहे. काही लोक झोपेचे सोंग घेत असतील तर मी काय करू?