प्रशासनाने अक्कलकोट तालुक्यात गेल्या तीन दिवसांत केवळ २२.७६ इतकी मिलिमीटर पाऊस झाला आहे. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याने कुरनूर धरणात भरमसाठ पाणी वाढत आहे. यामुळे पाटबंधारे विभागाकडून तीन गेटद्वारे बोरी, हरणा नदीत कधी १८००, तर कधी ९०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. म्हणून अधूनमधून पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. नदी तुडुंब वाहत असल्याने खरिपाचे काही पिके पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी पुलावरून, तर काही ठिकाणी बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
तडवळ भागातील सीना नदी काठोकाठ भरून वाहत आहे. भीमेला म्हणावे तसे पाणी नसले तरी नदीपात्र भरले आहे. यामुळे तहसीलदार बाळासाहेब सिरसाट यांनी रात्रंदिवस नदीकाठच्या कुमठे, कोर्सेगाव, कल्लकर्जाळ, खानापूर, गुद्देवाडी, आळगे, अंकलगी आदी गावांना भेटी देऊन ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा सूचना दिल्या आहेत. या भागातील गावात तलाठी, सर्कल, पोलीस पाटील, कोतवाल यांना ठाण मांडून राहण्याचे आदेश दिले आहेत. मंडळ अधिकारी आय.के. अत्तार, तलाठी महेश राठोड, विकास घंटे, तलाठी भासगी, वाघमारे, कोतवाल राजकुमार पाटील, पोलीस पाटील मळसिद्ध कांबळे, प्रकाश बिराजदार, शिवाजी कोरे, जर्दनबाशा कुमठे आदींचे पथक रात्रीचा पहारा देत आहे.
गेल्यावर्षी पुराचा फटका बसल्याने नदीकाठच्या रामपूर, सांगवी, बोरी उमरगे, बिंजगेर, आंदेवाडी, मिरजगी, रुददेवाडी, संगोगी (ब.), चिंचोळी (न.), अशा काही गावातील लोक रात्री जागरण करीत आहेत. पाणी वाढत गेल्यास कोणत्याही क्षणी स्थलांतरित होण्याच्या तयारीत ते आहेत.
पिके पाण्याखाली, कल्लकर्जाळ बंधारा पाण्याखाली
बोरी, हरणा नदीतील पाण्यामुळे दुधनी-आंदेवाडी (ज.), पुलावर पाणी वाहत आहे. चिंचोळी (न.) येथील शेतकरी शांतप्पा बिराजदार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे खरिपातील उडीद, मूग, तूर यासारखी उभी पिके पाण्यात वाहून गेली आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कालवा निरीक्षक प्रशांत लोंढे यांनी दिली, तसेच या विभागात नदीकाठच्या गावांना वेळोवेळी माहिती देण्यासाठी केवळ एकच कर्मचारी काम पाहत आहे. सीना नदीतील पाण्यामुळे
कल्लकर्जाळ बंधारा पाण्याखाली गेला आहे, तर कोर्सेगाव बंधारा मार्गावर आहे. पाणी वाढत चालल्याने अवैध वाळू उपसा मात्र बंद झाला आहे.
-----
तालुक्यात बोरी, हरणा, सीना नदीत मोठ्या प्रमाणात पाणी येत आहेत. यामुळे संबंधित भागातील मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल यांना नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामस्थांना सूचना देण्यास सांगितले आहे. सध्या पूरपरिस्थिती नसली तरी कोणत्याही क्षणी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-बाळासाहेब शिरसाट, तहसीलदार
सीना नदीपात्रातील कल्लकर्जाळ येथील बंधारा पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे.
----