सोलापूर : एकामागून एक पावसाळ्यातील चार नक्षत्रांचा पाऊस म्हणावा तसा पडला नसल्याने यावर्षीचाही खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे. पाऊस पडेल या अपेक्षेवर बहुतांश शेतकºयांनी पेरण्या केल्या असल्या तरी पिके मात्र येण्याची शक्यता मावळली आहे. सरासरीच्या अवघा ४३ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी ३९ टक्के इतकाच पाऊस पडला होता. त्यामुळे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील पिके आली नाहीत. शेतकºयांनी पेरणीवर केलेला खर्चही वाया गेला होता. याशिवाय पाऊस पडला नसल्याने द्राक्ष, केळी, ऊस, डाळिंब व अन्य फळपिकांनाही फटका बसला आहे. उजनी धरण क्षेत्र, भीमा नदीकाठ तसेच अन्य जिल्ह्यातील धरणातील पाणी मिळालेला अल्पसा भाग वगळता अन्य ठिकाणी बागायती क्षेत्र पाहावयासही शिल्लक राहिले नाही. यावर्षी तरी पाऊस पडेल, अशी अपेक्षा शेतकºयांची होती. मात्र रोहिणी, मृग, आर्द्रा व पुनर्वसु ही चारही नक्षत्रे काही गावांचा अपवाद सोडला तर कोरडीच गेली आहेत. काही मंडलांत पाऊस बºयापैकी पडल्याची नोंद पर्जन्यमापकांच्या आधारे झाली असली तरी ती एका गावासाठीच मर्यादित असल्याचे सांगितले जाते. मंडलातील एक-दोन गावांतच पाऊस पडतो व त्याची नोंद होते, असे शेतकरी सांगतात.
सोलापूर जिल्ह्यातील ९२ पैकी ६० मंडलांत ७० मि. मी. पेक्षा कमी पाऊस पडला आहे. काही मंडलांत तर ६ मि.मी. इतकाच पाऊस पडला आहे. ५० दिवसांत ७० मि.मी. पर्यंत पडलेला पाऊस हा कधी-कधी पडलेला पाऊस आहे. त्यामुळे जनावरांसाठी गवत येण्यासारखाही पाऊस पडलेला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बºयाच शेतकºयांनी पेरण्या उरकून घेतल्या आहेत. काही शेतकºयांनी जनावरांसाठी मका पेरणी केली आहे. मात्र पाऊस नसल्याने उगवणही होणे कठीण आहे. उगवण झाली तर अळींचा प्रादुर्भाव असल्याने जनावरांसाठी चारा असलेले मका पीकही अळ्याच फस्त करण्याची भीती आहे. काही मंडलांत चांगला पाऊस पडला असला तरी सरासरी ४३ टक्के पाऊस पडल्याची नोंद मात्र झाली आहे.
या मंडलांत पडला ७० मि.मी.पेक्षा कमी पाऊस - शेळगी, तिºहे, वळसंग, मुस्ती, विंचूर, खांडवी,वैराग, उपळे दुमाला, बानगाव, नारी, जेऊर, तडवळ, करजगी, किणी, वाघोली, कामती बु., शेटफळ, सावळेश्वर, नरखेड, पेनूर, टाकळी सिकंदर, मोडनिंब, लऊळ, सीना दारफळ, रोपळे क., टेंभुर्णी, म्हैसगाव, करमाळा, कोर्टी, केत्तूर, केम, जेऊर, उमरड, सालसे, अर्जुननगर, पंढरपूर, कासेगाव, तुंगत, पुळूज, चळे, करकंब, सांगोला, हातीद,नाझरा, संगेवाडी, शिवणे, माळशिरस, लवंग, सदाशिवनगर, इस्लामपूर, नातेपुते, अकलूज, दहिगाव,बोराळे, मरवडे, हुलजंती,भोसे, आंधळगाव,मारापूर आदी.
पडलेल्या पावसाच्या आधारे खरीप पेरणी झाली आहे. पाऊस पडेल या अपेक्षेने शेतकरी पेरणी करु लागले आहेत. मात्र पिकांना पोषक पाऊस पडत नाही. त्यामुळे खरीप पेरणी वाया जाण्याची शक्यता आहे. मात्र यापुढे चांगला पाऊस पडला तर तूर व मका ही पिके येऊ शकतात.- बसवराज बिराजदारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी