दक्षिण सोलापूर : तालुक्यातील मद्रे येथील पाणीपुरवठा योजनेच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
तीन हजार लोकसंख्या असलेल्या मद्रेची तहान भागविण्यासाठी विंधन विहीर घेऊन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टाकी बांधूनही त्यात पाणी सोडण्यात येत नाही. महिला आर्थिक विकास महामंडळाने दिलेल्या सिंटेक्स टाकीत पाणी सोडण्यात येत आहे. अशा पद्धतीने गावाची तहान भागत असताना दोन लाख १६ हजार रुपये थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केल्याने गावकºयांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. गावातील हातपंपाचे पाणी पिण्यायोग्य नाही. आता एकाच विंधन विहिरीवर गावाला अवलंबून रहावे लागत आहे. शेतकºयांच्या विहिरी व बोअरचे पाणी आणताना नागरिकांना पिकातून ये-जा करावी लागत आहे. यामुळे पिकांची व शेतीचीही नासाडी होत आहे.
ग्रामपंचायतीची विविध कराची वसुली कमी प्रमाणात होत आहे. घरपट्टी व पाणीपट्टी याशिवाय उत्पन्नाचे अन्य मार्ग नाहीत. यासाठीच महावितरणचे देयक थकलेले आहे. लवकरच थकीत रक्कम भरुन पाणीपुरवठा सुरू करू. -विजयालक्ष्मी व्हनमाने, सरपंच, मद्रे
ऐन उन्हाळा सुरू होतानाच केवळ ग्रामपंचायत प्रशासन हे लोकांना वेठीस धरण्याचे काम करत आहे. पदाधिकाºयांपेक्षा प्रशासन प्रमुख असलेल्या ग्रामसेवकांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे पाणीपुरवठा बंद आहे. लवकर पाणीपुरवठा न केल्यास तीव्र आंदोलन करु.-अमोल कांबळे, नागरिक, मद्रे