संताजी शिंदे
सोलापूर : डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले सोलापुरातील सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या डाळिंब फळाची आवक वाढल्यामुळे दर घसरले आहेत. एरवी १०० ते १२० रुपये किलोने विकला जाणारा डाळिंब सध्या ४० ते ५० रूपये दराने मिळत आहे. बाजारात डागाळलेली फळे येत असल्यानेही मागणी कमी झाली आहे.
सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती ही डाळिंब फळाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दररोज डाळिंबाचा व्यापार चालतो. सोलापूर जिल्ह्यात एकूण २१ हजार २८९ क्षेत्रात डाळिंबाच्या बागा आहेत. ११ तालुक्यातून दरवर्षी ८.८८ मेट्रिक टन डाळिंबाचे उत्पादन होत असते. बाजार समितीमध्ये दररोज ८ ते १० हजार कॅरेट (प्रति कॅरेट २० किलो) मालाची आवक होते.
जिल्ह्याबरोबर उस्मानाबाद, बीड, विजयपूर, गेवराई, शहागड, अंबड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बारामती आदी भागातून डाळिंबाची मोठी आवक होते. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दररोज मोठ्या प्रमाणात डाळिंबाची आंध्र प्रदेश, उडिशा आणि पश्चिम बंगाल येथे निर्यात होत असते. यंदा कमी-जास्त होणाºया पावसामुळे बाजारात डागाळलेला माल मोठ्या प्रमाणात येत आहे. गणेश आणि भगवा या दोन जातीपैकी भगवा डाळिंबाची सर्वात जास्त आवक होत आहे.
आंध्र प्रदेश, उडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये पाऊस जास्त असल्यामुळे सध्या वाहतुकीवरही परिणाम होत आहे. दर्जेदार फळे ४० ते ५० रुपये किलोने मिळत आहेत. डागाळलेले डाळिंब हे ३० ते ३४५ रुपये तर त्याच्यापेक्षा थोडा कमी दर्जाचा १००, १५० ते २०० कॅरेटने मिळत आहे. नेहमीपेक्षा ५० ते ६० टक्के दर कमी झाल्याने सध्या शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दर घसरल्याने शेतकरी अडचणीत...- बाजार समितीमध्ये दिवसाकाठी डाळिंबाची ६० ते ७० लाखांची उलाढाल होत असते. मागील वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी आवक वाढली आहे. डाळिंब व्यापार गेल्या दोन महिन्यात तेजीत आला होता. वाढती आवक, डागाळलेला माल आणि कमी झालेली निर्यात, यामुळे डाळिंब व्यापार अचानक घसरला आहे. आंध्र प्रदेश, उडिशा, कोलकाता ही सोलापूरच्या डाळिंबाची मुख्य बाजारपेठ आहे. सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, अहमदनगर, सांगली, इंदापूर, जतसह कर्नाटकातील विजयपूर, इंडी आदी ठिकाणी उत्पादन होणारा डाळिंब सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत असतो. सध्या दर घसरल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाचा व्यापार दररोज चालतो. सोलापूरसह इतर जिल्ह्यातील शेतकरी आपला माल घेऊन येत असतात. सध्या अनियमित पावसामुळे डागाळलेला डाळिंब बाजारात येत आहे. शिवाय वाहतुकीची समस्या असल्याने निर्यात कमी होत आहे. याचा परिणाम व्यवसायावर झाला असून दर कमी झाले आहेत. - मन्सूर माडीवाले, डाळिंब व्यापारी, सिद्धेश्वर मार्केट यार्ड, सोलापूर.
तीन एकरात १२०० झाडे आहेत, खूप कष्ट आणि मेहनत घेऊन डाळिंबाची लागवड करावी लागते. मोठ्या अपेक्षेने डाळिंब बाजारात आणला होता, मात्र एकूण उत्पादन खर्चाच्या फक्त १० टक्के नफा झाला आहे. हीच स्थिती राहिली तर डाळिंबाच्या बागा काढून टाकाव्या लागतील. - नीलकंठ दळवी, शेतकरी, कर्जत, जिल्हा अहमदनगर.