सोलापूर : प्रतिदिन साडेचार लाख लिटर इतक्या उचांकी संकलनाचे शिखर गाठलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे संकलन सध्या ७५ हजार लिटर इतके खाली आले आहे. दुग्ध व्यवसाय वाढीकडे होत असलेले दुर्लक्ष, खासगी संघाच्या स्पर्धेत दूध उत्पादकांना मिळणारा दर तसेच घातलेल्या दुधाचे पैसे मिळण्याचे सातत्य राहिले नसल्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे. गतवर्षीपेक्षा ५० हजार लिटर्सने यावेळी संकलन कमी झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यात दुधाची क्रांती झाली ती सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघामुळेच (दूध पंढरी). अकलूजचा शिवामृत सहकारी संघ वगळता उर्वरित जिल्ह्याचे दूध संकलन ४ लाख ३५ हजारांवर गेले होते; मात्र काळाच्या ओघात खासगी संघांना भरभराटी आली होती. आज मात्र दूध संघांवर कोणी दूध देता का, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
मागील वर्षी राज्यात अतिरिक्त दूध झाल्याने दराची घसरण झाल्याने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला; मात्र मागील वर्षी प्रमाणेच याहीवर्षी जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस पडला नसल्याने जनावरांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. याचा परिणाम दूध संकलनावर झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात मागील सहा महिन्यात वरचेवर दूध संकलनात १० लाख लिटरची घट झाली आहे. एकीकडे दूध पावडरीचा दर प्रतिकिलो ३५० रुपयांवर गेला तर दुसरीकडे दूध संकलनात मोठी घट झाली.
यामुळे खासगी दूध संघांनी दूध खरेदी दरात वरचेवर वाढ करणे सुरू ठेवले आहे. एक सप्टेंबरपासून जवळपास सर्वच खासगी संघांनी प्रतिलिटर ३० रुपये व त्यापेक्षा अधिक दराने दुधाची खरेदी सुरू केली आहे. त्याचा परिणाम जिल्हा सहकारी दूध संघावर झाला असून प्रतिदिन ७० ते ७५ हजार लिटर इतकेच संकलन होत असल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षी याच काळात संघाचे संकलन सव्वा लाख लिटर इतके होत होते. अनुदानाची रक्कम शासनाकडे अडकली असली तरी संघाने शेतकºयांना अनुदानासह पैसे दिले आहेत. खासगी संघ दूध उत्पादकांना आकर्षित करण्यासाठी कमिशन वाढवून देणे, शेतकºयांना आगाऊ पैसे (उचल) देणे, बिल वेळेवर देणे अशा सवलती देऊनही दूध संकलनात वाढ होताना दिसत नाही.
केगाव शीतकरण केंद्राला फटका...- सोलापूर शहरालगतच्या केगाव शीतकरण केंद्रावर अवघे १५ हजार लिटर दूध संकलन होत आहे. मागील दोन महिन्यात या शीतकरण केंद्रावर उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातून ३० हजार लिटर दूध गोळा होत होते. संकलनात सगळीकडेच घट झाल्याने जिल्हा दूध संघाच्या केगाव शीतकरण केंद्रावर ५० टक्के दूध कमी झाले आहे.
शासनाकडे अनुदानाची रक्कम अडकली, शासन आदेशानुसार सातत्याने शेतकºयांना दर दिल्याने संघावर अधिक भार पडला. आता संघ अडचणीतून जात असताना दूध उत्पादक अधिक दर देणाºयांना दूध घालत आहेत. शासनाचे नियम आम्हाला बंधनकारक आहेत ते खासगीला नाहीत.- प्रशांत परिचारक चेअरमन, सोलापूर जिल्हा दूध संघ