ब-हाणपूर : शासनाने दिलेल्या रमाई व पंतप्रधान आवास योजना पूर्ण करण्यात वाळूअभावी लाभार्थ्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. मार्च एंडपूर्वी शासकीय कर्मचारी आणि अधिका-यांनी ठरवून दिलेल्या कालावधीत घरकूल पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत . मात्र, लाभार्थ्यांना वाळू सहजासहज उपलब्ध होत नाही. यामुळे चपळगाव मंडलात अनेक घरकुलांचे काम जोथ्यापर्यंतच झाले आहे.
वाळू व विटा यांचा दर गगनाला भिडल्याने बांधकाम कसे करायचे ? असा प्रश्न लाभार्थ्यांपुढे उपस्थित झाला आहे. वाळू प्रति ब्रासपोटी दहा हजार रुपये तर हजार विटांसाठी पाच हजार रुपये मोजावे लागत आहे. रमाई आवास योजनेला शासनाने मंजूर केलेले १ लाख २० हजार रुपयांमध्ये दोन खोल्या, शौचालय, बाथरूम, फरशी , पत्रे, खिडक्या एवढेच काम होत आहे. या तुटपुंज्या निधीत घर बांधून पूर्ण होणे अशक्य आहे. शासनाने दिलेला निधी आणि स्वतःचे काही पैसे घालून चांगले घर बांधण्याचे स्वप्न लाभार्थी पाहतात. परंतू बांधकाम साहित्याचे वाढलेले दर, उपलब्ध होत नसलेली वाळू अशा अनेक प्रश्नाच्या चक्रात आर्थिक अंदाज चुकत आहे . अशात शासकीय कर्मचारी वारंवार लाभार्थ्यांना काम पूर्ण करा म्हणून तगादा लावत आहेत.
---
जप्त केलेली वाळू द्या
चपळगाव मंडलातील गावांना हरणा नदीतील वाळू मिळायची. परंतू नदी भरून पाणी असल्याने वाळु उपशाचा ठेका बंद आहे. वाळू उपलब्ध होईना. अन्य ठिकाणची वाळू ही उपलब्ध होत नाही. यासाठी शासनाने घरकुल धारकांना हरणा नदीतून वाळू पलब्ध करुन द्यावे किंवा शासनाने जप्त केलेली वाळू लाभार्थ्यांना द्यावी अशी मागणी लाभार्थी रवी ईरवाडकर, संजय कांबळे, श्रीशैल गवळी, जयसिंग कांबळे, शहाजी उकरंडे,विठ्ठल उकरंडे, सुहास उकरंडे, रवी बनसोडे, रमेश बनसोडे यांनी केली आहे.
---------
घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्यामुळे घराचे काम अर्धवट स्थितीत आहेत. शासनाने जप्त केलेला वाळूसाठा घरकुल लाभार्थ्यासाठी खुला करावा. जेणेकरून शासनाला महसूल आणि लाभार्थ्यांना वाळूही मिळेल. वाळू, सिमेंटचे दर वाढल्याने अनुदान तुटपुंजे ठरत आहे. हे अनुदान दुप्पट करण्याचा ठराव पंचायत समिती बैठकीत मांडणार आहे.
-अ. खय्युम पिरजादे.
पंचायत समिती सदस्य, अक्कलकोट
===========
शासनाच्या नवीन वाळू निर्मिती धोरण २०१९ नुसार कोणत्याही शासकीय एजन्सीला जप्त वाळू देऊ शकतो. त्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदने घरकुल लाभार्थ्यासाठी जिल्हाधिका-यांकडे मागणी करावी. जिल्हाधिका-यांच्या परवानगीनंतर जप्त वाळू शासकीय दराने घरकुलासाठी मिळेल.
- अंजली मरोड
तहसीलदार, अक्कलकोट.
---
२४ ब-हाणपूर
चपळगाव मंडलात वाळूअभावी घरकुलांचे बांधकाम ठप्प आहे. ब-हाणपूरमधील एक दृश्य