आप्पासाहेब पाटील
सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील सर्वच मार्गांवरील दुहेरीकरण व विद्युतीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, सर्वेक्षण अहवालाअभावी कुर्डूवाडी - लातूर - लातूर रोड रेल्वे स्थानकापर्यंतचे दुहेरीकरणाचे काम रखडले आहे. अर्थसंकल्पात निधी मंजूर होऊनही काम अद्याप सुरू न झाल्याची खंत रेल्वे प्रवासी संघटनेकडून व्यक्त केली जात आहे.
प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार रेल्वे प्रवासी संघटना व सोलापूर, उस्मानाबाद, लातूर भागातील लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार रेल्वे मंत्रालयाने २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात कुर्डूवाडी - लातूर - लातूर रोड या रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामास मंजूरी दिली होती, २०१५ - १६च्या अर्थसंकल्पात या रेल्वेच्या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी ७२.५४ लाखांच्या निधीची तरतूद केली होती. मात्र, याबाबत कोणतीच हालचाल दिसत नसल्याचे लक्षात येताच लातूरच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांची भेट घेतली अन् संबंधित मार्गाबाबत चर्चा केली असता महाव्यवस्थापक शर्मा यांनी गुरूवार, १७ जानेवारी २०१९ रोजी तत्काळ सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही दोन वर्ष उलटून गेले अद्याप सर्वेक्षणाचा अहवाल वरिष्ठांना न मिळाल्याने या कामाला प्रत्यक्षात सुरूवातच झाली नाही.
दुहेरीकरणासाठी मिळालेला निधी तिजोरीतच...
रेल्वेच्या अर्थसंकल्पात कुर्डूवाडी - लातूर - लातूर रोड या रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासंदर्भात तीन वेळा निधीची तरतूद करण्यात आली, आतापर्यंत ७०० कोटी रुपये या मार्गाच्या कामासाठी मंजूर आहेत. मात्र, सर्वेक्षण अहवालाअभावी हाही निधी तिजोरीतच पडून आहे.
दिरंगाईमुळे कामाची किंमत वाढतेय...
मागील सात वर्षापासून कुर्डूवाडी - लातूर - लातूर रोडच्या कामासाठी आतापर्यंत ७०० काेटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, जसजशी या मार्गाच्या कामासाठी दिरंगाई होत आहे, तसेतसे या मार्गाच्या कामासाठीची किंमत मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. या कामासाठी दोनदा टेंडर प्रक्रिया पार पडली. एकदा कामाचे टेंडर पुण्यातील एका कंपनीने घेतले होते. मात्र, पुन्हा ते काम रखडले.
या कामासंदर्भात मीच पाठपुरावा केला होता, आमची ही जुनी मागणी आहे. आता सरकारकडून निधी मंजूर असतानाही कामे होत नाहीत तर आश्चर्य आहे. मी पुढील आठवड्यात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहे, त्यावेळी हा विषय मार्गी लावणार आहे, लवकरच कुर्डूवाडी-लातूर-लातूर रोड मार्गावर दुहेरीकरणाचे काम सुरू होईल.
- अभिमन्यू पवार, आमदार, औसा, जि. लातूर