जत-इंदापूर या राष्ट्रीय महामार्गावरील सांगोला ते महूद रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी, चारचाकी, जड-अवजड वाहनधारकांना सध्या जीवघेण्या खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर २२ कि.मी. अंतरात सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. या पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे हेच पाणी रस्त्यावर येऊन साचून राहत असल्यामुळे वाताहात झाली आहे.
या रस्त्यावरील महूद महाराष्ट्र बँकेजवळ, परीट वस्तीकडे जाणाऱ्या रोडनजीक, महाजन लवाण, वाकी गावाच्या पुढे, शिवणे गाव मुख्य चौक परिसर तेथून चिंचोली तलाव व सांडव्याच्या पुलाच्या परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे हेच पाणी रस्त्यावर साचून राहत आहे. या पाण्यातून जड-अवजड वाहने गेल्यानंतर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रहदारीसाठी धोकादायक बनला आहे.
दोन-तीन वेळा तात्पुरती मलमपट्टी
राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या ठिकाणी यापूर्वी दोन-तीन वेळा तात्पुरती मलमपट्टी केली. मात्र, पुन्हा हेच खड्डे डोके वर काढत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता समजून येत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, अद्याप काम सुरू झाले नाही. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, जड-अवजड वाहतुकीची रात्रंदिवस वर्दळ असल्यामुळे लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी सभापती बाळासाहेब काटकर यांनी केली आहे.
कोट :::::::::::::::::::::
राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रस्त्याचे नव्याने काम मंजूर झाले आहे. मात्र, पावसामुळे खड्डे बुजवून डांबरीकरण करता येत नाही. पाऊस थांबल्यानंतर रस्त्याची तत्काळ दुरुस्ती केली जाईल.
- विजय स्वामी
उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर
फोटो ओळ :::::::::::::::::::::
सांगोला-महूद रोडवरील शिवणे चौकात रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यात दूध वाहतूक करणारा टँकर अडकल्याचे छायाचित्र.