संताजी शिंदे सोलापूर : गेल्या दोन वर्षांतील कमी पाऊस, पिकाची शाश्वती नाही. अशा अवस्थेत पर्यायी आणि खात्रीशीर उत्पादनासाठी मत्स्य व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसातच मासे हाताला येणार, अशी आशा करत असताना कोणीतरी विष टाकले आणि पाच हजार मरून पाण्यावर तरंगताना पाहून हत्तूर येथील मत्स्य व्यावसायिकांची निराशा झाली. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद नोंदविली आहे.
रमेश शिवशरण आणि प्रकाश बनशेट्टी-पुजारी या दोन शेतकºयांनी हत्तूर येथील एका व्यक्तीची १६ एकर पडीक शेती करण्यासाठी घेतली आहे. गेल्या दोन वर्षांत पाऊस कमी झाला, शेतात म्हणावे तसे उत्पन्न काढता आले नाही. शेतीला पूरक व्यवसाय असावा, पर्यायी उत्पन्न असावे म्हणून शेतकºयांनी याच शेतात असलेल्या कृत्रिम तळ्यात मत्सपालन करण्याचा निर्णय घेतला. जून २०१८ मध्ये २५ हजार रुपये खर्चून कृत्रिम तळ्यात कटला आणि सुपरनेस जातीची सुमारे पाच हजार माशाची पिल्ले कृत्रिम तळ्यात सोडले. माशांना दररोज खाद्य देण्याचे काम शेतकºयांमार्फत केले जात होते.
जूनमध्ये सोडण्यात आलेले मासे हळूहळू मोठे होऊ लागले होते. जून २0१९ मध्ये हे मासे पूर्ण मोठे होऊन विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवण्याची तयारी शेतकरी करीत होते. पाण्यात पाळीव प्राणी कुत्रा, मांजर आणि अन्य जनावरे जाऊ नये म्हणून तारेचे कुंपण बांधण्यात आले आहे. माशांना अन्य पक्षांचा उपद्रव होऊ नये म्हणून तळ्याच्या वरच्या बाजूला जाळी बांधण्यात आली आहे. जाळी काही ठिकाणी फाटल्यामुळे पाण्याच्या वरचा काही भाग मोकळा आहे.
प्रकाश बनशेट्टी-पुजारी यांनी नेहमीप्रमाणे १४ फेब्रुवारी रोजी माशांना खाद्य टाकले आणि निघून गेले. १५ फेब्रुवारी रोजी पुन्हा खाद्य घेऊन तळ्याजवळ आले असता, त्यांना पाण्याच्या आतील मासे हे पाण्यावर तरंगताना दिसून आले. हा काय प्रकार म्हणून त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, आतमध्ये मासे मरून पडल्याचे लक्षात आले. अवघ्या चार महिन्यात माशाचे उत्पन्न मिळणार आहे, अशी आशा बाळगणाºया प्रकाश बनशेट्टी हे डोक्याला हात लावून जमिनीवर बसले. ८ ते ९ वर्षांचे कष्ट वाया गेले या विचाराने ते विचलित झाले.
तूर गेली, कांदा फसला, माशाने वाकवले...- शेतात अन्य जमिनीवर तूर लावण्यात आली आहे. तुरीला भाव मिळणार नाही म्हणून जास्त लक्ष कांद्याकडे दिले. कांद्याला जास्त पाणी दिले, कांदा हातात आला; मात्र बाजारात त्याची किंमत घसरली. हा कांदा आता शेतात सडत आहे. तुरीकडे लक्ष न दिल्यामुळे या पिकाची अपेक्षा करता येत नाही. ज्या मत्स उत्पादनाची अपेक्षा होती ती तर एका रात्रीत संपली. अंगाचे पाणी करून दिवस रात्र शेतात राबणारे प्रकाश बनशेट्टी सध्या हवालदिल झाले आहेत. तूर हातातून गेली, कांद्यानं फसवले आणि माशाने वाकवले अशी अवस्था शेतकºयाची झाली आहे.