यशवंत सादूल
सोलापूर : प्रेताचं दहन असो अथवा दफन... अंत्यविधी आटोपताच कधी एकदा पाय स्मशानभूमीच्या गेटबाहेर पडतील, हाच विचार मनी येतो. कानावर पडणाºया चित्र-विचित्र आवाजांचा भास... कावळ्यांचा कावकाव... त्यातच जळणारी प्रेते अशा स्थितीतही स्मशानभूमीतही दुपारची वामकुक्षी घेणारे काही डेअरर सोलापूरकरही पाहावयास मिळतात.
जगाचा निरोप घेतल्यानंतर पार्थिव देह अंत्यविधीसाठी स्मशानात नेतात, त्यावेळी आप्तस्वकिय हजर असतात. दु:खाचा प्रसंग, स्मशानभूमीतील सुतकी, दूषित वातावरण यातून बाहेर पडणाºया लोकांना तेथील तास-दीड तासाचा कालावधीही नकोसा वाटत असतो. अंत्यसंस्कार झाल्यानंतर मात्र शांत झालेल्या वातावरणात वाढलेली झाडी, मोकाट जनावरांचा मुक्त वावर, प्रेत जळताना सुटणारा दुर्गंध अशी तेथील परिस्थिती असते.
सर्वसामान्य माणसाचा अत्यंत कमी वावर असतो, मात्र अशा ठिकाणी दुपारची वामकुक्षी घेण्यासाठी एखादी व्यक्ती आली नि चक्क थडग्यावरच झोपी गेली तर मात्र नवलच वाटेल. हा प्रत्यक्ष अनुभव सोमवारी पाहावयास मिळाला तो मोदी येथील मोरे हिंदू स्मशानभूमीत. याबद्दल तेथील कर्मचारी, सेवकांना विचारले असता त्यांनी सांगितले की, असे अनेकदा घडते. बहुतेक करून दुपारी स्मशानात वर्दळ कमी असते़ काही लोकांना येथे छान झोप लागते म्हणून येतात, असे सांगितले़
सुखी माणसे !- नेहमी शेळ्या, म्हशी चरण्यासाठी येणारे गुराखीही झाडाखाली विश्रांतीसाठी थांबतात. क्वचित प्रसंगी तेही डुलकी मारतात. काही मनोरुग्णही स्मशानभूमीत विश्रांती घेतात, परंतु गर्दी, गोंधळापासून दूर स्मशानभूमीसारख्या ठिकाणी शांतता असते़ त्यातच सोलापूरचा पारा चाळीस अंशावर वाढत जात असताना येथील थंडगार जागा काहींना भुरळ पाडते आणि कशाचीही तमा न बाळगता खुशालपणे तेही येथील थडग्यावर झोपणारे खरोखरच जगातील सर्वात सुखी माणसे असतील, असे म्हणायला काही हरकत नाही़