वैराग येथील सासुरे फाटा येथे असलेल्या अर्णव शैक्षणिक संकुलामध्ये मुख्याध्यापकाच्या कार्यालयाचे नुतनीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या येथील महत्त्वाची कागदपत्रे, दस्तऐवज कपाटे, कॉम्प्युटर साहित्य बाजूचे हॉलमध्ये ठेवले होते. या हॉलमध्ये गुरुवारी पहाटे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आतील साहित्य व कागदपत्रांना आग लागली. त्यात सर्व साहित्य जळून खाक झाले. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शाळेतील कर्मचारी प्रशांत चव्हाण, नागेश जाधव, अविनाश गोरे, यशवंत बारंगुळे, सोमनाथ घायतिडक यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र भडका उडाल्याने ती लवकर आटोक्यात आली नाह. त्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या तसेच इतर साहित्य जळाले, अशी माहिती वैराग पोलिसात नोंद झाली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक विनय बहिर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी हळे यांनी भेट देऊन पंचनामा केला. यात २० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.