सोलापूर : आपल्या खास अदाकारीने भावनिक केलेल्या ग्राहकांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून या बारबाला वेड लावतात. रंगीत दुनियेत रात्र घालवणारा तरुण मद्य, सिगारेट, गुटखा या व्यसनाबरोबर गुन्हेगारीकडे वळतो. आॅर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालणाºया डान्सबारमधील छमछमपायी शहर आणि जिल्ह्यातील तरुणाई बरबाद होताना दिसत आहे.
बारबालेची ओळख झाल्यानंतर ती आपल्या अदाकारीने ग्राहकाला मोहित करते. दिवसभरात फोन आणि चॅटींग झाल्यानंतर ती रात्री हॉटेलला येण्यास सांगते. हॉटेलला येत असताना खिसे भरून येणारा तरुण मोठ्या रुबाबात प्रवेश करतो. हातात अंगठ्या, गळ्यात लॉकेट, महागडा मोबाईल आणि सोबतीला ४ ते ५ लोकांचा लवाजमा घेऊन सोफ्यावर बसतो.
एकीकडे पैशाच्या माळा मुलींवर घालण्यासाठी विनंती करणारा कर्मचारी तर दुसरीकडे मद्यासह खाद्य पदार्थाची आॅर्डर घेणारा ग्राहकाजवळ जातो. या लोकांकडे जास्त लक्ष न देता ग्राहक बारबालेकडे एक नजरेने पाहत वाटेल तशी आॅर्डर देतो. सर्व गोष्टी टेबलवर येतात आणि मैफील रंगते, समोर नृत्याचा आविष्कार होताच किती मद्य प्राशन झाले याची तमा राहात नाही. सोबतचा लवाजमाही बेधुंद होतो. हा प्रकार नित्य नियमाचा होऊन जातो, तरुणांच्या दिवसभराच्या कामावर परिणाम होतो. रात्री पैसा जातो, वेळ जातो शिवाय व्यसनाधीनता वाढते.
नेहमीची बारबाला जर एखाद्या नवीन ग्राहकाकडे पाहून जर नृत्य करीत असेल, तर मग प्रेमवीर टेन्शनमध्ये येतो. मद्याचा डोस वाढतो, सिगारेटचे झुरके हॉटेलमध्येच ढग करतात आणि वरून गुटख्याच्या पुड्यांचा कचरा वाढतो. प्रतिस्पर्धी ग्राहकाबरोबर दोन हात करण्याची तयारी होते. हा सर्व प्रकार हॉटेलमधल्या डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात शांतपणे सुरू असतो. ग्राहक जर आक्रमक झाला तर त्याला तत्काळ बाहेर काढले जाते. मग बाहेरचा आवाज आत येत नाही, आतला आवाज बाहेर जात नाही. दिवसभराच्या निवांत वेळेत बारबाला व ग्राहक नवीन प्रेयसी व प्रियकरांप्रमाणे एकमेकांना वचनबद्ध होतात. ग्राहक जर विवाहित असेल तर तो स्वत:चा संसार, पत्नी, मुलाबाळांना विसरून जातो. अविवाहित असेल तर तो तिच्यासोबत लग्नाची स्वप्ने पाहतो. एखाद्या बारबालेचे जर ग्राहकाशी मतभेद झाले किंवा ती दुसºयाशी जवळीक साधली तर मात्र मोठा भडका उडतो.
जोपर्यंत पैसा तोपर्यंत बारबाला...- ग्राहकाजवळ जोपर्यंत उडवण्यासाठी पैसे असतात, तोपर्यंत ती त्याच्या समोरून हटत नसते. जेव्हा पैसा संपतो तेव्हा ती दुसºया ग्राहकाचा शोध घेते. वास्तविक पाहता हा तिचा व्यवसाय आहे; मात्र तिथे ग्राहकाच्या भावना दुखावतात आणि मग सुरू होतो वाद. बारबाला आपल्याला पहिल्यासारखे बघत नाही, बोलत नाही असे लक्षात आल्याने काही महाशय ग्राहक हात कापून घेणे, हातावर पेट्रोल ओतून पेटवून घेणे, खासगी रिव्हॉल्व्हर स्पर्धक ग्राहकावर रोखून हावेत गोळीबाराचे प्रकार सोलापुरातील हॉटेलमध्ये घडले आहेत. बाहेर रुबाबात असणारा ग्राहक बारबालेसाठी पायरीवर बसून लहान मुलांप्रमाणे रडण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. काही कालावधीनंतर बारबाला एकदा हॉटेलमधून निघून गेली की ती पुन्हा येत नाही. तिचा बँडप्रमुख तिला दुसºया हॉटेलमध्ये पाठवून इकडे नवीन बारबालेला बोलावून घेतो. या प्रकारानंतर मात्र तरुण कायमचा देवदास होतो.