काशिनाथ वाघमारे सोलापूर : रमाबाई आंबेडकर नगरातील तीन बुद्धविहारातून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर होतोय. या बुद्धविहारात ३३ बौद्धाचार्यांकडून नव्या पिढीवर संस्कार आणि धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर होत आहे. ४३ वर्षांपूर्वीच्या या नगरात मीराताई आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि जोगेंद्र कवाडेंपासून चळवळीतील अनेक नेत्यांनी या नगराला भेटी देऊन येथील आंबेडकरप्रेमींशी संवाद साधला आहे.
बुधवार पेठ परिसरात १९७५ साली रमाबाई आंबेडकर नगर वसले़ या नगराने समता सैनिक दलाचे बाबा कांबळे, माजी परिवहन सभापती मल्लप्पा शिंदे, भारतीय बौद्ध महासभेच्या शहर अध्यक्षा धम्मरक्षिता कांबळे, यशवंत साबळे, माजी नगरसेवक सुनीताताई भोसले यांच्यासह डॉक्टर, वकील, पोलीस आणि अनेक उद्योजक दिले़ या साºयांनी आपल्या नगराची वेगळी ओळख निर्माण केली आहे़ १९७८ साली पहिले तरुण मंडळ येथे अस्तित्वात आले़ आंबेडकरी विचाराच्या प्रेरणेतून ‘मातोश्री रमाबाई आंबेडकर वाचनालय’ सुरू झाले आणि आजच्या पिढीच्या जडणघडणीत ते योगदान देणारे ठरले आहे़ तसेच या नगरातील तरुणांनी बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक सलोखा राखणारे रोजा इफ्तार पार्टी, सामुदायिक विवाह असे अनेक उपक्रम राबवित असतात़
आंबेडकर उद्यानातून संघटन - या नगराला दुसरी एक ओळख मिळाली, ती म्हणजे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर उद्याऩ १९९२ साली या उद्यानाच्या उभारणीला सुरुवात झाली़ या नगराला वेस (कमान) नसली तरी आंबेडकर उद्यान हीच सध्याची ओळख आणि प्रवेशद्वार ठरली आहे़ बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे अजित गादेकर यांनी या उद्यानाच्या दोन्ही बाजूला नवी कमान व्हावी आणि आणखी एक ओळख मिळावी म्हणून प्रयत्न करताहेत़ उद्यानात आबालवृद्धापासून सारीच मंडळी या ठिकाणी जमतात़ अनेक कार्यक्रमांची आखणी, विचारांची पेरणी या उद्यानातून होते़ त्यामुळे आंबेडकर उद्यान हे सध्या चळवळीचे संघटन केंद्र ठरले आहे.
चळवळीचे जिल्ह्याचे केंद्रस्थान - या नगरातून अनेकांनी आपली वेगळी ओळख समाजापुढे आणली आहे़ भारतीय बौद्ध महासभेचे कामकाज १९८० पासून येथून चालते़ नामांतराच्या चळवळीत या नगरात राहणारे कै़ शिवाजी कसबे, बबन आहेरकर, मल्लप्पा शिंदे, अर्जुन गायकवाड अशा अनेक आंबेडकरप्रेमींनी सहभाग नोंदविला़ यापैकी शिवाजी कसबे आणि बबन आहेरकर यांना मथुरेत अटक करून दिल्लीच्या जेलमध्ये एक महिना ठेवण्यात आले होते़ या दोघांना झालेली ही शिक्षा समाज आज विसरू शकत नाही़ अशा अनेक चळवळींची चर्चा या नगरात आजही होते़ त्यामुळे रमाबाई आंबेडकर नगर हे आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थान बनले.
- - विशेषत: शिवा-भिवा गायन पार्टी येथे तयार झाली़ राजू गायकवाड, कै़ विजय कांबळे या कलावंतांनी गाण्यातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार, प्रसारही केला़ याबरोबरच धम्मगंध बुद्धविहार, आम्रपाली बुद्धविहार आणि रमांजली बुद्धविहार असे तीन विहार उभे झाले़ या विहारातून बाबासाहेबांची शिकवण, विचार, आचरण, त्यांच्या कार्याची महती ३३ बौद्धाचार्यांकडून नव्या पिढीला दिली जाते आहे़ त्यांच्याकडून दररोज पाठांतर आणि विधी सोहळा होतो़