नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. त्यामध्ये वरील धोरणात्मक विषयावर नगरपालिकेतील शिवसेनेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी निविदेतील त्रुटींचा पाढाच वाचल्याने या विषयाचे गांभीर्य सत्ताधारी पक्षाच्याही लक्षात न आल्याने हा विषय सर्वानुमते तहकूब करण्यात आला आहे.
विषयपत्रिकेवरील विषय क्रमांक १९ च्या अनुषंगाने विरोधी पक्षाच्यावतीने ज्येष्ठ नगरसेवक विलास रेणके व विरोधी पक्षनेते अक्कलकोटे यांनी उपसूचना दिली होती. या विषयावर अक्कलकोटे यांनी निविदा मंजुरीबाबतच्या त्रुटी व तांत्रिक बाबींवर बोट ठेवत सभागृहात चर्चा केली. तर प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी दगडे पाटील यांनी विषयावर प्रशासकीय बाजू मांडली.
विरोधी गटाच्यावतीने दिलेल्या उपसूचनेत म्हटले आहे की, विषय क्रमांक १९ मधील १०० कोटी रुपयांच्या परवडणारी घरे योजनेच्या कामासाठी प्राप्त निविदा पत्रकावर निर्णय घेण्याच्या अनुषंगाने त्रुटीयुक्त व नियमबाह्य आहे. त्यामुळे घरकुल योजनेतील लाभार्थ्यांवर आर्थिक भुर्दंड पडणार आहे, असे अक्कलकोटे यावेळी म्हणाले.
त्यामुळे विहित कालावधीत सदरचा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नसल्याने विहिती कार्यपध्दती व आर्थिक आकृतिबंध निश्चित होऊन स्पष्टता होण्यासाठी डीपीआरला विहित सुधारित मान्यता घेणे आवश्यक असल्याने सदरची निविदा प्रक्रिया रद्द करावी, असे म्हटले आहे.
----