संतोष आचलारे
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी-मुस्ती मार्गावर गुलाबी शेती बहरली असल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थितीत अत्यंत कमी पाण्यावर येथील परिसर शेतकºयांनी गुलाबी करून टाकला आहे. शेतकºयांच्या चिकाटीमुळे येथील कुटुंबाला सक्षम रोजगार मिळत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तांदुळवाडी गावाचा खवा उत्पादनासाठी नावलौकिक आहे. अजूनही ही गावाची ही ओळख कायम असतानाच गुलाबी शेती पिकविणारा म्हणून नवीन गावाची ओळख परिसरात होत आहे.
गावातील सुमारे ५0 ते ६0 एकर क्षेत्रात शेतकºयांनी अर्धा एकर, एक एकर या प्रमाणात गुलाबी शेती केली आहे. गावातील अल्पभूधारक शेतकºयांचा हा प्रमुख व्यवसाय ठरला असून यातून आर्थिक सक्षमता निर्माण करण्यात आली आहे.
गुलाब फूल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी विक्रीसाठी आणतात.यासाठी शेतकºयांना भल्या पहाटे साडेचार वाजल्यापासूनच गुलाबांची काढणी करावी लागते.
मजुरांकडून फुलं तोडून घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.त्यामुळे शेतकरी कुटुंबातील सदस्यांकडून पहाटे फुलांची काढणी करण्यात येते. अंधारात फुलं काढताना अनेकदा काटे टोचतात, मात्र मळा पिकविण्याची जिद्द असल्याने येथील शेतकरी कष्टाने पहाटे फुले तोडताना दिसून येतात. दुचाकीवर रोजच सोलापूरला स्वत: शेतकरीच गुलाबाची फुलंही आणतात.
अशी आहे लागवडीची पद्धतगुलाबी काड्यांची लावण जमिनीत करण्यात येते. रोपांची लावण झाल्यानंतर तीन महिन्यांत रोपांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येते. त्यानंतरच्या काळात गुलाबाची फुले लागतात. रोपांची योग्य वाढ होण्यासाठी पुरेशी आवश्यक खते देण्यात येतात. रोपांची योग्य वाढ होण्यासाठी काही प्रमाणात औषधांची फवारणीही करण्यात येते. रोपांची लागवड करताना शेणखत टाकण्यास येथील शेतकरी प्राधान्य देतात. रासाययिक खतांपेक्षा ही मात्रा अधिक चांगली ठरत आहे.