सोलापूर : विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुरुवारपासून ( दि.२) परीक्षांवर बहिष्कार आंदोलनामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठाच्या ऑक्टोंबर/नोव्हेंबर २२च्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्या आहेत.
दरम्यान, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही गेल्या ५ वर्षापासून ३ वेळा आंदोलन पुढे ढकलले. परंतु आम्हाला आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. त्यामुळे आम्हाला नाइलाजाने हे आंदोलन करावे लागत आहे, असे सोलापूर विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात व सरचिटणीस रविकांत हुक्कीरे, कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले व सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभिजित जाधव व सचिव भीमा मस्के यांनी कळविले आहे
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना एक महिन्यापूर्वी आंदोलनाचे निवेदन देऊनही त्यांनी आंदोलनाच्या एक दिवस अगोदर बुधवारी (दि.१) सायंकाळी महाविद्यालय व विद्यापीठ सेवक संयुक्त समितीची बैठक घेतली. या चर्चेत सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत सुरु करण्याबाबत मंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री यांच्यासोबत चर्चा करुन हा प्रश्न सोडवण्यात येईल असे स्पष्ट केले. १४१० कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्याची कार्यवाही १५ दिवसात पूर्ण करण्यात येईल तसेच ५८ महिन्याच्या थकबाकी बाबत वित्त मंत्र्यांसोबत बोलून हा विषय तातडीने सोडवण्यात येईल, असे सांगण्यात आले. अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. परंतु लेखी आश्वासन नसल्यामुळे हे आंदोलन ०२ फेब्रुवारीपासून सुरू राहील, असे कृती समितीने जाहीर केले.