सोलापूर - काल रात्रभर पडलेला पाऊस अन् सकाळपासून ढगाळ हवामानामुळे सोलापूरच्या तापमानात मोठी घट झाली आहे. दरम्यान, ३७ अंशावर पोहोचलेले तापमान आज ३२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. बदलल्या हवामानाचा शेती पिकांसाठी माणसांच्या आरोग्यावरही होत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर व ग्रामीण भागातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी कडक उन्ह तर कधी जोरदार पाऊस तर कधी थंडी असा तिहेरी वातावरणाचा अनुभव सोलापूरकरांना येत आहे. त्यात गुरूवारी रात्रीच्या सुमारास शहरासोबतच ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. या अचानक पडलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय शहरातील डिजीटल फलक, झाडांचेही नुकसान झाले. पावसामुळे महावितरण कंपनीचेही नुकसान झाल्याची नोंद वीज मंडळ कार्यालयात झाली आहे. आज सकाळपासून सोलापूर शहरातील हवामान ढगाळ असल्याने तापमानाची तीव्रता कमी झाली आहे. काही भागात गार वारे वाहू लागले आहे. सकाळी काही भागात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याचे सांगण्यात आले.