अचानक पडलेल्या पावसामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिक, अबालवृद्धांना थंडगार हवेचा दिलासा मिळाला.
सांगोला शहर व तालुक्यात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे सर्वांच्या अंगाची लाहीलाही होत असून लोक प्रचंड उकाड्याने हैराण झाले आहेत. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शेतकरी राजा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेतीच्या मशागतीची कामे सुरू असताना वळवाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
दरवर्षी एप्रिल व मे महिन्याच्या कालावधीत सांगोला तालुक्याला वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसतो. हे काही नवीन नाही. अशातच गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड तापमानात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात रिमझिम पाऊस पडू लागला आहे. सोमवारी सायं. ६ नंतर अचानक वातावरणात बदल झाल्याने मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात होताच रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट झाला.