पंढरपूर : मान्सून दाखल होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी असला तरी शनिवारी वादळी वा-यासह झालेल्या मान्सूनपूर्व मुसळधार अवकाळी पावसामुळे शेळवे, वाखरी परिसरातील डाळिंब, केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. या पावसात बेदाणा शेडवरील कागद उडून बेदाणा भिजल्याने शेकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्याचे तातडीने पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.
यावर्षीचा पावसाळा सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वीच मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागील १५ दिवसांत सलग दुस-यांदा वादळी वा-यासह मुसळधार अवकाळी पाऊस झाला आहे. हा पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेळवे येथील तात्यासाहेब सरडे, तुकाराम गाजरे, विकास आसबे या शेतक-यांच्या केळीच्या बाग उन्मळून पडल्या आहेत. याशिवाय वाखरी, भंडीशेगाव, गादेगाव, पटवर्धन कुरोली, कासेगाव, करकंब, भाळवणी, टाकळी, बोहाळी परिसरातील गावांमध्ये केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. वा-यामुळे काही केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे हातातोंडाला आलेला घास हिरावल्याने केळी उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.
---
डाळींबाची फळे गळाली
१ जूनपासून बाजार समित्या सुरू होतील, अशी शक्यता असताना त्यापूर्वीच वादळीवारे व अवकाळी पावसाने डाळिंबाची फळे गळून पडली आहेत. अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे खुल्या बाजारात स्वत:चा माल विकता आला नाही म्हणूण काही शेतक-यांचा बेदाणा निर्मितीकडे कल आहे. अनेकांनी आपल्या बागा उतरून बेदाण्यासाठी पत्रा शेडमध्ये माल टाकला आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे या पत्रा शेडवरील पत्रे, प्लास्टिक कागद उडून गेल्यामुळे बेदाणा भिजून अक्षरशा चिखल झाला आहे.
---
दोन हेक्टर केळीची बाग येत्या काही दिवसांत उतरण्यासाठी सज्ज होती. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे बाग उतरली नव्हती. मात्र, शनिवारी झालेल्या अतिवृष्टी व वादळी वा-यामुळे संपूर्ण बाग जमीनदोस्त झाली आहे. त्यातून सावरणे अवघड आहे. तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी.
- सागर गाजरे
केळी उत्पादक शेतकरी, शेळवे
--
फोटो : ३१ शेळवे, ३१ करकंब
शेळवे (ता. पंढरपूर) येथील शेतकऱ्यांचा केळीच्या बागा वादळी वारे व अतिवृष्टीमुळे अशा जमीनदोस्त झाल्या आहेत.