सोलापूर : ग्रामीणमध्ये जुलै महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १२ दिवसांचा होता तर तो आता आॅगस्टमध्ये १५ दिवसांवर आला आहे. चाचण्या वाढल्याने रुग्णांचा शोध होत आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली.
जुलैअखेर जिल्हा आरोग्य विभागाने २६ हजार ७१५ चाचण्या केल्या होत्या. यात २३ हजार १९ रुग्ण निगेटिव्ह तर ३ हजार ६५३ रुग्ण पॉझिटीव्ह आले होते. आता १७ आॅगस्टपर्यंत ६३ हजार ३६६ चाचण्या झाल्या. त्यात ६३ हजार २६0 अहवाल प्राप्त झाले. यात ५५ हजार ३८३ जण निगेटिव्ह आले तर ७ हजार ८७८ जण निगेटिव्ह आले. पॉझिटीव्ह येण्याचा दर १२.४५ टक्के आहे. जुलैअखेर हा दर १३.६९ टक्के होता. आॅगस्ट महिन्यात बरे होण्याचे प्रमाणही ५८ टक्क्यावरून ६१ टक्क्यावर गेले आहे. ग्रामीणमध्ये १६ आॅगस्टपर्यंत ४५ हजार ५७१ रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या असून, यात ४ हजार ३९ जण पॉझिटीव्ह आले आहेत तर ४0 हजार ३२६ जण निगेटिव्ह आले आहेत.
ग्रामीणमध्ये सद्यस्थितीत ७१३ प्रतिबंधित क्षेत्र कार्यरत असून, यात ३ लाख २४ हजार ७५३ इतकी लोकसंख्या निरीक्षणाखाली आहे. या क्षेत्रात जिल्हा आरोग्य विभागाची ८८७ पथके सर्वेक्षणासाठी कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून कोरोना संसर्गाचा प्रभाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात अँटिजेन टेस्टसह पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर राबवली जात आहे.
बाधित गावांची संख्या वाढली
- - १३ आॅगस्टपर्यंत ग्रामीणमध्ये १0२९ पैकी ६0९ गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग पोहोचला नव्हता. ४२0 गावातच आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळले होते. पण आता गेल्या चार दिवसात ही संख्या वाढली आहे.
- - ४७८ गावात आता कोरोना पोहोचला आहे. चार दिवसात ५८ गावांची भर पडली आहे. यात बार्शी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १३0 पैकी ७५ गावे, पंढरपूर: ९४ पैकी ५७ गावे, अक्कलकोट: ११७ पैकी ४७ गावे, करमाळा: १0५ पैकी २४ गावे, माढा: १0८ पैकी ३९ गावे, माळशिरस: १0७ पैकी ५४, मंगळवेढा: ७९ पैकी ३0, मोहोळ: ९४ पैकी ४४, सांगोला: ७६ पैकी ३१, दक्षिण सोलापूर: ८३ पैकी ५२ आणि उत्तर सोलापुरातील ३६ पैकी २५ गावे बाधित झाली आहेत.