शीतलकुमार कांबळे
सोलापूर : दिवाळीच्या काळात अनेक जण दुसऱ्या गावातून आपल्या गावी परतले. बाजारामध्येही माणसांची गर्दी दिसून आली. या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या चाचणीत वाढ करण्यात आली आहे.
यापूर्वीच प्रशासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली होती. यादरम्यान दिवाळी सण आल्याने अनेक नागरिक हे प्रवास करून आपल्या गावी परतले होते. त्यांच्याकडून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असू शकतो. मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सोलापूर जिल्ह्यातही चाचणीत वाढ करण्यात आली आहे.
ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यामध्ये सरासरी दीड हजार चाचण्या करण्यात येत होत्या. आता यात एक हजाराने वाढ करण्यात आली आहे, तर शहरात सुमारे ७०० चाचण्या होत होत्या. यात आता ३०० चाचण्याची वाढ केली आहे. एकूणच शहर व जिल्ह्यामध्ये सुमारे १३०० चाचण्यांची वाढ होत आहे. यातच शाळा सुरु करण्याच्या उद्देशाने शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
दिवाळीमध्ये चाचणी संबंधित काळजी घेण्यात आली. प्रशासनातर्फे ट्रेसिंग करत असल्यामुळे चाचणीसाठी गर्दी झाली नाही. आता शिक्षकांना चाचणी करणे बंधनकारक केल्यामुळे त्यांची गर्दी झाल्याचे दिसत आहे. सध्या तरी चाचण्या वाढत असल्या तरी रोजचा रुग्णांचा आकडा कमी होत आहे. तरीही प्रशासन चाचणीमध्ये वाढ करत असून पर्याप्त प्रमाणात टेस्ट किट उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगितले. रुग्णांची संख्या कमी असल्याने शहर व जिल्ह्यातील कोविड बेड मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. गरज पडल्यास या बेडवर कोरोना रुग्णाला उपचार घेता येऊ शकते.
चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेची मदतकोरोना चाचण्यांची संख्या वाढत असली तरी ओपीडीमध्ये गर्दी दिसून आली नाही. महापालिकेची आरोग्य केंद्रे तसेच शासकीय हॉस्पिटल्स सज्ज होती. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक, मित्र आणि कार्यालयातील कर्मचारी यांची चाचणी करण्यात येत होती. n रुग्णांची संख्या कमी असल्याने संपर्कातील व्यक्तींची संख्या कमी झाली. शहरात महापालिकेने आवाहन केल्याने व्यावसायिकांनी स्वत:हून पुढाकार घेत चाचण्या केल्या. तर काही व्यापाऱ्यांनी खासगी प्रयोगशाळेच्या मदतीने कोरोनाची चाचणी करून घेतली.