सोलापूर : शासनाच्या आदेशानुसार प्रतिबंधित प्लास्टिक मोहीम सोलापूर शहरात आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत आहे. शुक्रवारी शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठेत अचानक तपासणी केली असता सहा व्यावसायिक दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. त्या दुकानदारांविरोधात दंडात्मक कारवाई महापालिकेने केली आहे.
सोलापूर महापालिका हद्दीत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असली तरी दुकानदार, नागरिकांकडून सर्रास त्यांचा वापर सुरू आहे. त्यामुळे दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा समावेश असतो. प्लास्टिकचे दुष्परिणाम माहीत असताना, पालिकेकडून याबाबत जनजागृती, दंड आकारणी होत असतानाही नागरिक तसेच दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबलेला नाही. त्यामुळे पालिकेने कठोर भूमिका घेत प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. यापुढे प्लास्टिक पिशव्या बाळगल्यास २५ हजार रूपये दंड आणि संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.
३५ दुकानांची केली तपासणी...
सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक, मुख्य निरीक्षक यांनी शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठांमधील ३५ दुकानांची पाहणी केली. त्यामध्ये सहा व्यवसायधारकांकडे प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आल्याने त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दत्त चौक, सिद्धेश्वर मंदिर परिसर व अन्य बाजारपेठेत कारवाईची मोहीम राबविण्यात आली.