सोलापूर : पवित्र रमजान महिन्यात उपवसात सातत्यपणा ठेवतात. अशा वेळी प्रकृतीही जपली जाते. प्रकृती जपणा-या आणि ऊर्जा देणारे उपवसाचे पदार्थ खाताना सोलापूरकरांनी प्राधान्यक्रम दिला आहे. इफतारनंतर समोसे खाऊन शरीराला ऊर्जा देतात. अशाप्रकार रमजान महिन्यात रोजा करणा-या बांधवांना दररोज एक लाख समोसे लागतात. शहरातील दहा कुटूंब त्यासाठी पहाटे ५.३० वाजता उठून या कामाला लागतात. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत हे कुटूंब राबतात.
शहरात विजापूर वेस, बारा ईमाम चौक, किडवाई चौकसह अनेक ठिकाणी रमजान काळात लागणारे उपवसाचे पदार्थ विकले जातात. येथील होलसेल विक्रेत्यांना समोसे पुरवणारे शहरात दहा कुटूंब आहेत. जब्बार शाबाद, समीर शाबाद हे पिता-पूत्र त्यांच्यापैकी एक.शाबाद यांच्या कुटूंबातील महिला आणि पुरुष असे सात जण हे या व्यवसायात राबताहेत. पहाटे या कामाला सुुवात होते. पहिल्या पाळीत मैदा मळून पीठ बनवले जाते. हे पीठ मळण्यात दोन तास लागतात. त्यानंतर त्यापासून रोटी बनवली जाते. त्यानंतर त्यामध्ये कांदा, कोथिंबीरी, मीठ, मिरची यांचा मसाला रोटीत भरला जातो. त्यापूर्वी एका रोटीत तीन तुकडे करतात अर्थात तीन समोसे एका रोटीत होतात. रोटीत मसाला भरताच या कामाला वेग मिळतो. त्यानंतर ते कडईतील गरम तेलात ते तळून घेतले जातात. त्यानंतर थंड हवेला हे कच्चे समोसे वाळवायला, कडक व्हायला ठेवतात. त्यानंतर ते होलसेल विक्रेत्यांना देतात. होलसेल विक्रेत्यांच्या माध्यमातून किरकोळ विक्रेत्यांकडे विक्रीला दिले जातात.