सोलापूर : ग्रामसेवक नसलेल्या नान्नज ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी गावात बुधवारी जंतुनाशक फवारणी केली. मात्र, कोणता ग्रामसेवक द्यायचा यावर एकमत न झाल्याने नान्नजला ग्रामसेवक मिळू शकला नाही.
अनेक गावांतून ग्रामसेवकाबाबत तक्रारी आहेत. नान्नज येथील मीनाक्षी तोडकर यांचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला. मात्र, तालुक्यात सर्वांत मोठ्या नान्नज ग्रामपंचायतीला ग्रामसेवक नसल्याचे समोर आले. बुधवारी ग्रामसेवक देण्याबाबत चर्चा झाली. मात्र, कोणाला पदभार द्यायचा यावर एकमत झाले नाही. ग्रामसेवक नसला तरी गावपातळीवर पदाधिकाऱ्यांनी गावात फवारणी केली.
पाकणी, कौठाळी,
तळेहिप्परगा व इतर ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत तक्रारी असल्या तरी पंचायत समिती प्रशासन दखल घेत नसल्याचे दिसत आहे. डेंग्यूचा फैलाव वाढू नये यासाठी बुधवारपर्यंत तालुक्यातील १२ गावांत धुरळणी करण्यात आली असल्याचे बीडीओ प्रशांत देशमुख यांनी सांगितले.
-----
पदभार द्यायचा तरी कोणाला?
नान्नजचा पदभार देण्यासाठी गंगाधर कांबळे नंतर नंदकुमार पाटील यांचे नाव पुढे आले. मात्र, दोन्ही नावाला नेत्यांकडून विरोध झाला. त्यामुळे आता नव्या नावाचा शोध सुरू असल्याचे सभापती रजनी भडकुंबे यांनी सांगितले. गंगाधर कांबळे, अनिल शिंदे, राम कांबळे, मारुती कांबळे, के. के. ठेवले, हाके या ग्रामसेवकांकडे प्रत्येकी दोन गावांचा पदभार आहे.
-----