तालुक्यात या वेळेला निवडणूक बिनविरोध न होता सर्रास ठिकाणी आणखी नव्या उमेदवारांची भर पडत दुरंगी होणारे सामने तिरंगी, चौरंगी, बहुरंगी होत आहेत. त्यामुळे निवडणुकीतील रंगत दिवसेंदिवस वाढत गेली. आठ दिवसांपासून प्रचारात प्रत्येक गटाकडून गावासह वाडीवस्ती, परगावच्या मतदारांकडेही दूरध्वनी, प्रत्यक्ष भेटीद्वारे आघाडी घेण्यात आली. प्रचारादरम्यान अनेक उमेदवारांनी मागील कटू अनुभव विसरुन विरोधकांचा विरोधक तो आपला सहकारी अशी निती अवलंबत अनेकांशी हातमिळवणी केल्याचे दिसून आले.
तालुक्यात ७१ ग्रामपंचायतीच्या प्रत्यक्ष निवडणुका होत असल्या तरी करकंब, गादेगाव, पटवर्धन कुरोली, कासेगाव, सुस्ते, बोहाळी, खर्डी, सोनके, गोपाळपूर, रोपळे, बाभुळगाव, नारायण चिंचोली, अजनसोंड, भाळवणी, भंडीशेगाव, उपरी, खरसोळी, रांझणी, चळे आदी संवेदनशील गावातील निवडणुकींकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
गावागावात निघाल्या रॅली
बुधवारी (दि. १३) ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. आठ दिवसात ‘होम टू होम’, कॉर्नर सभा घेत दिवसरात्र सुरू असलेला प्रचार थांबला. प्रत्येक गटातील उमेदवारांनी आपापल्या प्रभागात, गावात पदयात्रा, मोटारसायकल रॅली काढत मतदारांना आपण आपल्या ताकदीचा प्रत्यय घडवून दिला. या पदयात्रेतही आव्हे, पटवर्धन कुरोली, करकंब, गादेगाव, सोनके ही गावे आघाडीवर होती. पदयात्रेदरम्यान अनेक उमेदवार घराघरात जाऊन सर्वसामान्य मतदारांचे आशीर्वाद घेत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
फोटो ओळ :::::::::::::::::::::::::::::
आव्हे (ता. पंढरपूर) येथे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी निघालेल्या मोटारसायकल रॅलीने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.