निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार येथील महसूल विभागाच्या वतीने ही प्रक्रिया राबविण्यासाठी तालुक्यातील सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेत वर्ग केलं जाते. परंतु येथे ओळखीच्या कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्यूटी न लावता अनोळखी कर्मचाऱ्यांना मात्र वारंवार ड्यूटी लावत असल्याचा आरोप नूतन विद्यालयातील १४ शिक्षकांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केला आहे.
कुर्डूवाडी नूतन विद्यालयातून मुख्याध्यापक लक्ष्मीकांत डंके यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामासाठी आपल्या विद्यालयातील एकूण ३७ शिक्षकांची यादी माढा निवडणूक शाखेला पाठविलेली होती. त्यातून मोजक्याच १४ शिक्षकांना निवडणूक ड्यूटी लागली असून, उर्वरित २२ जणांना मोकळे सोडले आहे. या १४ शिक्षकांना मागच्या निवडणूक प्रक्रियेत ही ड्यूटी दिलेली होती. आम्ही निवडणुकीचे काम करण्यास तयार आहे, परंतु वारंवार आम्हालाच यात काम करावे लागत आहे, असे या शिक्षकांचे म्हणणे आहे.
त्या १४ शिक्षकांबाबत आमच्या महसूल विभागाकडून झालेला प्रकार मी स्वतः पाहत आहे. त्यांची आमच्याकडे आलेली यादी अगोदर तपासत आहे. खालील यंत्रणेकडून असे झाले असावे. जाणूनबुजून कोणाला ड्यूटी लावली नाही. नेमके काय झाले याची दखल घेत आहोत.
- राजेश चव्हाण, तहसीलदार, माढा
-------
माढा तहसील विभागाला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३७ शिक्षकांची यादी माझ्या विद्यालयातून पाठवली होती. परंतू नववी व दहावीच्या तासासाठी त्यातून काही शिक्षकांना बहुतेक वगळण्यात आले असावे. याबाबत तेथील नायब तहसीलदार यांच्याशी मी अगोदर चर्चा केली होती.
- लक्ष्मीकांत डंके, मुख्याध्यापक, नूतन विद्यालय, कुर्डूवाडी
----