सोलापूर : जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा प्राधिकरणाने ठराविक मार्गाची परवानगी दिल्यास ई रिक्षा नोंदणीला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ई रिक्षा व ई कार्ट नोंदणीबाबत ट्रेड प्रमाणपत्र मिळण्यासाठी दोन वितरकांनी पत्रव्यवहार केला आहे. यापूर्वीही हा विषय जिल्हा प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चेसाठी आला होता. शहरातील वाहतुकीची वर्दळ व रस्त्यांचा विचार करता रस्ता सुरक्षेच्या कारणास्तव शहर वाहतूक पोलिसांनी ई रिक्षांना परवानगी नाकारली आहे. केंद्र सरकारच्या परिवहन मंत्रालयाने ई रिक्षांना मोटार वाहन नियमामध्ये समाविष्ट केले आहे.
ई रिक्षासाठी चालकांना वेगळा वाहन परवाना असून तो फक्त विशिष्ट मार्गासाठी अटीवर दिला जाणार आहे. ई रिक्षांना काही विशिष्ट विभाग व विशिष्ट मार्गावरच परवाने दिले जाणार आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व महापालिका आयुक्त यांना ठराविक क्षेत्रात या वाहनांवर निर्बंध घालण्याचे अधिकार आहेत. या नियमावलीप्रमाणे ई रिक्षा वितरकांना ट्रेड प्रमाणपत्र देण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केल्याचे डोळे यांनी स्पष्ट केले.
रिक्षा परवाने खुले केल्यावर सोलापुरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहरात रिक्षाथांबे चांगल्या स्थितीत आहेत. नवीन परवाने दिलेल्या रिक्षा कोण चालवितात, त्यांच्याकडे परवाना आहे की नाही याची तपासणी मोहीम उघडली जाणार आहे. प्रत्येक रिक्षाचालकांना गणवेश सक्तीचा केला जाणार डोळे यांनी सांगितले. याप्रसंगी सहायक परिवहन अधिकारी सतीश जाधव, अशोक पवार, मोटार वाहन निरीक्षक अजित ताह्मणकर, सहायक निरीक्षक तानाजी धुमाळ उपस्थित होते.