सोलापूर : पेरणीपूर्व मशागत़़़ त्यानंतर योग्य त्यावेळी खुरपणी, फवारणी, खतांची मात्रा देऊन मोठ्या कष्टाने पिके जोमात आणली़ सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे़ काही ठिकाणी खळेही सुरू आहे. त्यातच रातोरात अवकाळी पावसाने शेतकºयांनी मोठ्या कष्टाने जोपासलेल्या या पिकांवर पाणी पाडून त्यांच्या कष्टाचे मोल शून्य केले़ या अवकाळी पावसामुळे ज्वारी, कडबा काळा पडणार तर द्राक्ष बागेतील मणी पडून शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे़ एकीकडे शनिवारीच शासनाने शेतकºयांना कर्जमाफीत कमावलं तर दुसरीकडे नैसर्गिक संकटाने शेतकºयांचा चिंतेत टाकत सर्वकाही गमावलं आहे.
शहर व जिल्ह्यात शनिवारी वादळी वाºयासह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. रविवारी सायंकाळी दुसºया दिवशीही सुमारे पाऊणतास पावसाची रिपरिप होती. रविवारी रात्री साडेआठपर्यंत सात मिलिमीटर पाऊस पडला. तत्पूर्वी शनिवारी रात्री आठ मिलिमीटर पाऊस पडला.
रविवारी दिवसभर नेहमीसारखे ऊन पडले होते. वातावरणात उकाडा जाणवत होता. त्यामुळे पावसाची शक्यता होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत आकाश निरभ्र होते. त्यानंतर आकाशात ढगांची गर्दी जमू लागली. तासाभरात पावसाचे टपोरे थेंब कोसळायला सुरुवात झाली. त्याचवेळी जोरदार वारेही वाहू लागले. काहीवेळात पावसाची रिपरिप सुरु झाली. होटगी रोड, विजापूर रोड यासह गावठाण भागातील पांजरापोळ चौक, बाळीवेस, चौपाड, एम्प्लॉयमेंट चौक परिसर, सिद्धेश्वर मंदिर येथेही पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते.
अवकाळीने द्राक्षाचे भाव गडगडले असून, द्राक्ष काढणी व विक्री थांबली आहे. द्राक्ष विक्री योग्य झाल्याने व्यापाºयांनी द्राक्ष बागा चढ्या दराने घेण्यास सुरुवात केली होती. ४० ते ५० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. परंतु अवकाळीच्या झटक्याने द्राक्ष भाव ३० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. व्यापारी मात्र द्राक्ष बागा घेण्यास धजावत नसल्याने याचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे़, अवकाळी पावसामुळे द्राक्ष घडात पाणी उतरून ते तडकलेल्या मण्यात शिरते. त्यामुळे प्रथम मणी नासण्याची क्रिया चालू होते. ते नासलेले पाणी पूर्ण द्राक्ष घडात उतरते व पूर्ण घड नासतो. औषध फवारणी करूनही त्याचा उपयोग होत नाही. परंतु द्राक्ष घडातील पाणी काढून सुकविण्यासाठी हवेची फवारणी सातत्याने करावी लागते़ हाच एकमेव पर्याय आहे.