सांगोला तालुक्यातील डाळिंब व सिमला मिरची उत्पादक शेतकऱ्यांना देशाची बाजारपेठ खुणावू लागल्यामुळे सांगोल्यातून थेट रेल्वे सुरू झाली पाहिजे, अशी अपेक्षा बाळगून होते. या पार्श्वभूमीवर भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी खा. निंबाळकर आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सांगोल्यासह जिल्ह्यातील डाळिंबासह इतर फळपिकांना देशाची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सांगोला रेल्वे स्थानकातून थेट किसान रेल्वे सुरू करावी, अशी मागणी होत होती. त्यांच्या मागणीची दखल घेऊन रेल मंत्रालयाने २१ सप्टेंबर रोजी सांगोला-मुजफ्फरपूर (पटना) ही पहिली किसान रेल्वे सांगोला रेल्वे स्टेशन येथून रवाना झाली.
सांगोला स्थानकातून सांगोला-दानापूर (पटना), सांगोला-शालिमार (कोलकाता), सांगोला-आदर्शनगर (दिल्ली) व सांगोला-सिकंदराबाद अशा चार किसान रेल्वे धावत आहेत. सांगोला ते दानापूर या किसान रेल्वेच्या आतापर्यंत ४३ फेऱ्या झाल्या असून, ३ कोटी १७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बंगळुरू-सांगोला-आदर्शनगर (दिल्ली) या रेल्वेच्या फेऱ्यातून ४० लाख रुपये, सांगोला-सिकंदराबाद रेल्वेद्वारे २३ लाख ५० हजार रुपये तर सांगोला ते शालिमार (कोलकाता) या फेरीतून १५ लाख असे ४ कोटी ५० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
फळे, भाजीपाला वाहतुकीसाठी ५० टक्के अनुदान
किसान रेल्वेमार्फत फळे आणि भाजीपाला वाहतुकीसाठी ५० टक्के अनुदान देत आहे. मालट्रकच्या तुलनेत रेल्वेने कमी खर्चात वाहतूक होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त माल किसान रेल्वेने परराज्यातील बाजारपेठेत विक्रीसाठी जात आहे. यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत असून, रेल्वेलाही याचा फायदा होत असल्याचे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी प्रदीप हिरडे यांनी सांगितले.
----