सोलापूर: सोलापूरच्या राजकारणात एकेकाळी वर्चस्व राखून असलेले पद्मशाली समाजातील दिग्गज नेते आज राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत करत आहेत़ कुणी पारंपरिक टेक्स्टाईल उद्योगात व्यस्त आहेत तर कुणी निवांतपणे निवृत्तीचे जीवन जागत आहेत़ बहुतांश नेते काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत़ काही नेते केवळ लोकसभा आणि विधानसभेपुरते राजकीय सहभाग नोंदवत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.
काँग्रेसचे माजी खासदार तसेच सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते गंगाधरपंत सिद्रामप्पा कुचन हे सध्या निवृत्तीचे जीवन जगत आहेत़ सध्या ते ८६ वर्षांचे आहेत़ एकेकाळी राज्यभरातील तब्बल ५२ सहकारी संस्थांवर ते कार्यरत होते़ विशेष म्हणजे, सोलापूरसह त्यांनी राज्यात २२ संस्थांची स्थापना केली़ कुचन यांनी अनेक मोठ्या समित्यांवरदेखील काम केले़ सेन्ट्रल सिल्क बोर्ड, बंगळुरू येथेही त्यांनी काम केले़ सध्या ते राजकीय घडामोडींपासून पूर्णपणे अलिप्त आहेत़ गेल्या विधानसभेला त्यांचा सहभाग काँग्रेससोबत होता़ त्यानंतर कुचन हे राजकीय वर्तुळात कुठेच दिसले नाहीत़ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते त्यांचा आशीर्वाद घ्यायला येतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात़ त्यांचा मौलिक सल्लादेखील घेतात़ कुचन हे अश्विनी रुग्णालयाचे माजी प्रेसिडेंट असून, सध्या रुग्णालयावर संचालक म्हणून कार्यरत आहेत़ रुग्णालयाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आवर्जून जातात.
पूर्वभागातील काँग्रेसचे दुसरे माजी खासदार धर्मण्णा सादूल हेदेखील सध्या निवृत्तीचे जीवन जगत आहेत़ दिवसा काही वेळ अक्कलकोट रस्त्यावरील त्यांच्या पेट्रोलपंपावर बसतात़ आलेल्यांशी संवाद साधत असतात़ त्यांचा बहुतांश वेळ हे वाचन आणि कुटुंबातील सदस्यांसोबत जात असल्याचे सादूल सांगतात़ निवृत्तीचे जीवन जगत असले तरी काँग्रेसच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना ते हजर असतात़ विशेष म्हणजे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचा सहभाग राहतो़ पक्षाकडून जी जबाबदारी मिळते, ते काम आवर्जून करतो, असे सादूल सांगतात़ सादूल हे शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या संपर्कात आहेत.
पूर्वभागातील सहकार नेते सत्यनारायण बोल्ली हेदेखील राजकारणापासून अलिप्त आहेत़ असे असले तरी सर्व पक्षांतील नेते त्यांच्या मार्गदर्शनाकरिता त्यांच्याकडे येतात़ शिखर बँकसारख्या मोठ्या वित्तीय सहकारी संस्थेत त्यांचा सहभाग होता़ अजित पवार हे शिखर बँकेत बोल्ली यांना ज्युनिअर होते, हे विशेष़ बोल्ली हे शरद पवारनिष्ठ आहेत़ सध्या सुशीलकुमार शिंदे यांच्याशी त्यांचा चांगला दोस्ताना आहे़ बोल्ली हे संवेदनशील आहेत़ त्यांना जे पटत नाही ते तोंडासमोरच बोलून जातात़ पूर्वभागात त्यांचा आदर आहे़ सध्या ते त्यांचा पारंपरिक टेक्स्टाईल व्यवसाय सांभाळतात.
पुंजाल, कारमपुरी....- राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्वभागातील नेते माजी महापौर जनार्दन कारमपुरी हे सध्या त्यांच्या व्यवसायात बिझी असतात़ राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांनादेखील त्यांची हजेरी असते़ ते शरद पवारनिष्ठ आहेत़ ते पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते़ पूर्वभागातील सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांची हजेरी असते़ राजकारणाच्या मुख्य प्रवाहात ते नाहीत़ तसेच माजी महापौर प्रा़ पुरणचंद्र पुंजाल हेदेखील राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून लांब आहेत़ महापालिकेत अनेक वर्षे नगरसेवक राहिले़ ते क्रीडाप्रेमी आहेत़ सध्या ते निवृत्तीचे जीवन जगत आहेत़ लक्ष्मी सहकारी बँक आणि पूर्वभाग सार्वजनिक वाचनालयात ते सक्रिय असतात़ त्यापलीकडे त्यांचा राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभाग नसतो़