सोलापूर : ज्वारीच्या कोठाराचा जिल्हा अशी ओळख असलेल्या सोलापुरात आता थंडीत पेरूची व्हरायटी पाहायला मिळत आहे. शरीराला हिवाळ्यात आवश्यक असणारे अनेक घटक मिळताहेत, असे मत आहारतज्ज्ञांनी व्यक्त केले. अगदी शुगर, बीपीही कंट्रोलमध्ये राहतो, असा सल्ला दिला आहे.
यंदा सोलापुरात पेरूची आवक मोठ्या प्रमाणात असून, बहुतांश पेरूचे उत्पादन हे जिल्ह्यातच आहे. आहारतज्ज्ञांच्या मते पेरूतून कार्बोहायड्रेटसह फायबर आणि एनर्जी मिळते. गावरान पेरू वगळता इतर प्रकारचे पेरू हे पाणीदार फळांमध्ये मोडतात. या पेरूमुळे मधुमेह, रक्तदाब नियंत्रणात राहतो. पेरू खाल्ला की, त्यातील साखर लगेच रक्तात वाढत नाही, असेही आहारतज्ज्ञांचे मत आहे.
विविध प्रकारचे पेरु-
सोलापुरात तैवान किंग प्रकारच्या पेरूची आवक मोठ्या प्रमाणात आहे, याचा दर २० ते २५ रुपये आहे. शहरात लखनऊ नावाचाही पेरू बाजारात आला आहे. याचा दर १५ ते २५ रुपये दरम्यान आहे. व्ही. एन. आर. प्रकारातील पेरुही सर्वांवर भुरळ घालतोय. आकाराने मोठा असून, माढ्यातून त्याची आवक आहे. रेड गुजरात नावाचा पेरु सध्या मुंबई आणि पुण्याच्या मंडईत आला आहे. मात्र, तो सोलापुरातील बाजारात अद्याप आलेला नाही. याचाही दर ३० रुपयांवर असून, इंदापूर आणि मराठवाड्यातून त्याची आवक आहे.
वरून हिरवट अन् आतून दिसते गुलाबी-
सोलापूरमध्ये वरून हिरवट आणि आतून गुलाबी रंगाचा पेरू साऱ्यांना भुरळ घालतोय. या पेरूची आवक इंदापूर आणि मोहोळ, कुर्डुवाडी, माढा, बार्शी येथून होते. त्याला तैवान किंग असे संबोधले जाते. सोलापुरात आता गावरानबरोबर कृत्रिमरीत्या पिकवलेला पेरूही विविध प्रकारात विक्रीला आला आहे.
ज्या हंगामामध्ये जे पेरू प्रकार येतात ते त्याच हंगामामध्ये खा. मुलांना जाम आणि जेली स्वरुपात दिल्यास स्पीकलीक अॅसिड वाढते. फायबरचे प्रमाण वाढते. मधुमेह, रक्तदाबही नियंत्रणात राहतो. मात्र, किडनीचा आजार असेल तर त्यांनी शक्यतो पेरू टाळावा. -नीलिमा हरीसंगम, आहारतज्ज्ञ