सोलापूर : मनामनात आनंदाचा रंग भरणारी रंगपंचमी सोमवारी २५ मार्च रोजी साजरी केली जात आहे़ यानिमित्त संपूर्ण शहर कोरडा इको फ्रेंडली रंग उधळण्यासाठी सज्ज झाले आहे़ या इको फ्रेंडलीमध्ये जवळपास २० हून अधिक प्रकारचे रंग दाखल झाले आहेत. चेन्नई आणि बंगळुरूहून हे रंग सोलापुरी बाजार पेठेत दाखल झाले आहेत.
शहरात विविध सोसायट्या आणि गजबजलेल्या चौकात, कॉलनीमध्ये रंग खेळला जातो़ तेवढ्याच उत्साहाने बेडर पूल आणि इतर झोपडपट्ट्यांमध्येदेखील रंग खेळण्याची परंपरा गिरणगावात दिसते़ पूर्व भागात कामगार आणि मालक रंग खेळताना पाहायला मिळतात़ सोमवार, २५ मार्च रोजी रंगपंचमी साजरी केली जात आहे़ गेल्या पाच वर्षांतील जनजागृतीचा परिणाम म्हणून पाण्यातील रंग खेळण्याऐवजी शरीरावर साईड इफेक्ट न होणारा इको फ्रेंडली रंग खेळण्यावर भर दिला जातोय़ अशा रंगांची दुकाने मधला मारुती, नवीपेठेत थाटली आहेत़ जीएसटी आणि इतर कर आकारणीमुळे कोरड्या रंगाच्या दरात २० टक्के तर काचेरी रंगाच्या दरात ३० टक्के वाढ झाली आहे़ मात्र चेहºयाला विद्रुप करणारा वारनेस रंग यंदा बाजारपेठेतून हद्दपार झाला आहे.
रंगगाड्यांना शाब्दी ग्रुप पुरवणार कलर - दरवर्षाप्रमाणे यंदा लोधी समाज बालाजी मंदिर ट्रस्टच्या वतीने रंगगाड्यांची मिरवणूक काढली जात आहे़ सोमवारी दुपारी २ वाजता मुर्गीनाला येथील बालाजी मंदिरापासून रंगगाड्यांची मिरवणूक काढली जाणार आहे़ दरवर्षीप्रमाणे यंदाही ५० रंगगाड्या सहभागी होताहेत़ यंदाही या रंगगाड्यांना शाब्दी सोशल ग्रुपच्या वतीने रंग पुरविला जाणार आहे. याचबरोबर गणेशोत्सवाच्या धर्तीवर मंडळप्रमुख वा गाडीचालकाला पोशाख, साखरेचा हार आणि ट्रॉफी देऊन सन्मान केला जाणार असल्याची माहिती शाब्दी ग्रुपचे प्रमुख रसूल पठाण यांनी दिली़
मुंबईतील पिचकाºयांची भुरळ...- शाळेच्या मुलांना मोह आवरता येणार नाही, असे वॉटर बॅग, फवारणीचा पंप अशा विविध प्रकारातील खेळणी रूपातील पिचकाºया यंदा मुंबईहून सोलापुरात दाखल झाल्या आहेत़ याबरोबर प्लास्टिक बंदूक, रंगाने भरलेले फुगे यांच्या खरेदीकडे ओढा दिसून येतोय़ १०० रुपये किलोपासून ते लहान-लहान वीस रुपयांची पाकिटे बाजारात दाखल झाली आहेत़ काचेरी डबे आणि इतर प्रकारचे सुटे पारंपरिक रंगही पाहायला मिळताहेत़