कुरुल : कामती खुर्द येथील परमेश्वर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यानी पर्यावरणपूरक वृक्षरुपी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा केला. प्रारंभी मुलांनी वृक्षसंवर्धन व विचार नियम यावर गीत म्हटले.
श्रीगणेशाची विविध रुपे सर्वानाच मोहित करतात पण श्रीचे असेच एक मोहक आणि पर्यावरणाचा संदेश देणारे रुप याठिकाणी साकारण्यात आले आहे . मी माणसात आहे, मी वृक्षात आहे, निसर्गात आहे असा संदेश देणारे वृक्षरुपी गणेश सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
या वक्षरुपी गणेशाचे महत्त्व समाजात पटवून देण्यासाठी व वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी पर्यावरनाचे रक्षण ही काळाची गरज असून निसगार्चे रक्षण झाले तरच जिवसृष्टीचे संरक्षण होईल, झाडे लावा, चैतन्य फुलवा. प्लॅस्टिक टाळा,पर्यावरण सांभाळा, सर्वानी मिळून प्रदुषण विरहित गणेशोत्सव साजरा करावा असा संदेशच जणू लोकांना आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी दिला.
या आगळा वेगळया उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आनंद वल्लाकाटी यांच्याहस्ते श्रीगणेशाची पुजा करण्यात आली. सुरेश गवळी व उत्तम थोरात यांच्याकडून विद्यार्थ्यांना वडापाव देण्यात आले.या प्रसंगी नवनवीन उपक्रम राबविल्यामुळे मुलांमध्ये होत असलेला प्रगती बद्दल मुलांचे व कर्मचाºयांचे अभिनंदन मुख्याध्यापक जब्बार शेख व संचालक रामभाऊ दुधाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी पुरी, आनंद पाटील, संतोष फपाळ, रज्जोद्दीन शेख,धनंजय केदार, बाळासाहेब माळी, गुरु बागदुरे आदीनी परिश्रम घेतले.