सोलापूर : शहरातील पथदिव्यांवर एलईडी बसविण्याचे काम संथगतीने सुरू आहे. वीज बिल बचतीचा उद्देश सफल झालेला नाही. त्यामुळे एलईडी दिवे बसविण्यासाठी ईईएसएल कंपनीला दिलेला मक्ता रद्द करण्यात यावा, असा सभासद प्रस्ताव भाजप, शिवसेना, एमआयएमच्या नगरसेवकांनी दाखल केला.
महापालिकेच्या वीज बिलात बचत व्हावी यासाठी शहरातील पथदिव्यांवर ४० हजार एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय झाला. यासाठी महापालिका, स्मार्ट सिटी कंपनी आणि ईईएसएल कंपनीमध्ये करार झाला होता. जानेवारी २०१९ मध्ये या कामाला सुरुवात झाली. गेल्या आठ महिन्यात ३१ हजार दिवे बसविण्यात आले आहेत. पण अनेक दिवे बंद पडल्याची तक्रार नगरसेवक करीत आहेत. मनपाची सर्वसाधारण सभा २७ आॅगस्ट रोजी होणार आहे.
यापार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ आणि सुभाष शेजवाल यांनी गुरुवारी सभासद प्रस्ताव दाखल केला. यावर भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील, संतोष भोसले, शिवसेनेचे राजकुमार हंचाटे, शिवसेनेचे भारतसिंग बडूरवाले, एमआयएमचे रियाज खरादी यांच्या सह्या आहेत. ईईएसएल कंपनीला एलईडीचे काम पूर्ण करण्यासाठी १० जून २०१९ चा कालावधी देण्यात आला होता. कंपनीला १७ जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. करारपत्राप्रमाणे कंपनीने शहरात उत्तम दर्जाचे दिवे बसविणे आवश्यक असताना हलक्या दर्जाचे दिवे बसविले आहेत. आजवर ३० हजार ३५६ दिवे बसविले आहेत. त्यातील २० टक्के दिवे बंद आहेत. ज्या ठिकाणी १०० किंवा ७० वॅटचे दिवे बसविण्यात येणार होते त्या ठिकाणी ४५, ३५ आणि २४ वॅटचे दिवे बसविले आहेत. रस्त्यावर पुरेसा प्रकाश न पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरसेवकांनी वेळोवेळी लक्षवेधी उपस्थित करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
विद्युत विभाग म्हणते ३९ लाख रुपयांची बचत - एलईडी बसविल्यामुळे महापालिकेचा वीज बचतीचा उद्देश सफल झाला नसल्याचा आरोप भाजप, शिवसेना आणि एमआयएमचे नगरसेवक करीत आहेत; मात्र महापालिकेच्या गेल्या महिन्यातील वीज बिलात ३९ लाख रुपयांची बचत झाल्याचा दावा विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी यांनी केला आहे. एलईडी दिवे बंद पडण्याच्या तक्रारी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
एलईडी दिवे बसविण्याचे काम कंत्राटदार करीत आहे. मनपाच्या विद्युत विभागातील कर्मचारी बसून आहेत. त्यांनी किमान बंद पडलेले दिवे बदलून घ्यायला हवेत. विद्युत विभागाच्या प्रमुखाने याकडे लक्ष द्यायला हवे. प्रशासनाचा वचक नसल्याने अनेक भागातील एलईडी बंद पडले आहेत. लोक वैतागले आहेत. त्यासाठी कंत्राटदाराचा मक्ता रद्द करायला हवा. - नागेश वल्याळ, नगरसेवक, भाजप.