सोलापूर : परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतातील पाणी न हटल्याने नोव्हेंबर संपत आला तरी सोलापूर जिल्ह्यात यंदा रब्बीच्या पेरण्या सुरूच आहेत. हंगाम लांबल्याने शेतकऱ्यांनी हरभरा आणि गव्हाची लागवड करण्यावर भर दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारीचे सर्वाधिक म्हणजे ३ लाख ५० हजार ८१७ हेक्टर इतके क्षेत्र आहे. दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रब्बीच्या पेरणीला सुरूवात केली जाते. पण यंदा याच काळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले गेले. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात पेरण्या होण्यास अडचण निर्माण झाली. सखल भागातील पाणी आटल्यावर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपत्या घेतल्या. पण ओढे, नाले, कालवे आणि नदी शेजारी असलेल्या क्षेत्रात पाणी साचून राहिल्याने पेरण्या करता आल्या नाहीत. वाफसा येईल तसे शेतकऱ्यांनी पेरण्यास सुरूवात केली आहे. आता ज्वारीच्या पेरणीला विलंब झाल्याने गहू व हरभरा पेरणीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.
१८ नोव्हेंबरअखेर ५९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची कृषी विभागाकडे नोंद झाली आहे. पीकनिहाय पेरणी झालेले क्षेत्र पुढीलप्रमाणे असून, कंसातील आकडे सरासरी क्षेत्र दर्शवित आहेत. ज्वारी: २ लाख २७ हजार ३५५ (३ लाख ५0 हजार), मका: १८ हजार ७२१ (३४ हजार २५८), गहू: ९ हजार ८0 (३८ हजार ८0३), हरभरा: ३३ हजार ११२ (५७ हजार ७९), तीळ: १४ (२३), जवस: १२२ (१४७), सूर्यफूल: ७५ (२ हजार २0५), करडई: ७५0 (२ हजार ६२७).
ऊस लागवडीवर भर
अतिवृष्टीमुळे यंदा रब्बी पेरणीला विलंब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता गहू व हरभऱ्याच्या पेरणीवर भर दिला आहे. त्याचबरोबर उसाचे क्षेत्र घटले होते. पण आता पाण्याची सोय झाल्याने सिंचन असलेले शेतकरी पुन्हा ऊस शेतीकडे वळले असून, लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.