लोकमत न्यूज नेटवर्क
माळशिरस : स्वातंत्र्यानंतरच्या काळात रेल्वेचा विस्तार झपाट्याने झाला. अनेक मोठ्या रेल्वे मार्गाची निर्मिती झाली. इंग्रज कालीन सर्वे व मंजूर असलेल्या लोणंद-पंढरपूर रेल्वेला मात्र शतक उलटूनही धावण्याची वाट पाहावी लागत आहे. दोन दशकांपासून या मार्गासाठी प्रयत्न सुरू आहेत. इतके वर्ष उलटूनही हा मार्ग का रखडला ? अशा उनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहेत.
रेल्वे प्रश्नासाठी अनेक नेतेमंडळींनी वेगवेगळ्या नेत्यांकडे शेकडो निवेदने दिली आहेत. मात्र या प्रश्नासाठी कुठलाही नेता अथवा कोणत्याही पक्षात आक्रमकता दिसली नाही. या मार्गासाठी लोकप्रतिनिधीच्या इच्छाशक्तीचा व प्रयत्नांचा जनरेटा वाढवण्याची गरज आहे. सध्या हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या या मार्गाचा सर्व्हे नव्याने सुरू झाला आहे. याच्या खुणा दिसू लागल्या आहेत. पूर्वीचा व नवा सर्व्हे संदर्भातला निर्णय लवकरच समोर येणार आहे. त्यामुळे या मार्गाबाबतच्या अशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
-----
यांनी दिला रेल्वेला धक्का ...
लोकसभेच्या जुन्या पंढरपूर व नव्या माढा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात या रेल्वेमार्गाच्या मुद्द्याची ढाल केली होती. माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी या मार्गासाठी पाठपुरावा सुरू केला होता. २०१० पासून रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून ॲड. सोमनाथ वाघमोडे यांनी जागृती केली. आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला. तत्कालीन खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी संसदेत पाठपुरावा केला. त्यानंतर खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडूनही प्रयत्न झाले. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राम सातपुते यांच्यासह अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत.
-----
तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अकलूजच्या सभेत यासंदर्भातील सूचक आश्वासन दिले होते. त्यानंतर सर्वेक्षणासाठी १०० कोटी रुपयांची तरतूदही झाली. मात्र सध्या यासाठी राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलण्याची अपेक्षा आहे. लवकरच याप्रक्रियेला गती येईल.
- रणजितसिंह मोहिते-पाटील
आमदार