सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्था आणि सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे सोलापूर जिल्ह्यातील चित्रकारांसाठी ग्रामीण समृद्धी या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. आमदार सुभाष देशमुख यांच्या विकासनगर येथील कार्यालयात चित्रकार्यशाळा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मृदादिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन केल्यामुळे कलाकारांनी शेती, पशुपालन, अध्यात्म, निसर्गसौंदर्य या ग्रामीण भागाशी निगडित विषयांवर सुंदर चित्र रेखाटले.
कलाकारांना मार्गदर्शन करताना सुभाष देशमुख म्हणाले, चित्रकार हा अत्यंत कल्पकतेने चित्राला साकारत असतो. या चित्रामध्ये सोलापूरचे वैभव, संस्कृती, आध्यात्मिक जीवन, सोलापुरात होणारे उत्पादन समोर यायला हवे. ही कला नक्कीच सर्वांना भावेल. शिल्पकारांनी देखील शिल्प घडविताना टाकाऊ वस्तूंचा वापर करावा. त्यांच्या कलेमुळे एका वाया गेलेल्या वस्तूला सौंदर्य लाभेल. कलाकारांमध्ये स्वत:च्या कलेचे मार्केटिंग करण्याचे कौशल्य असायला हवे. ऑनलाईन पद्धतीने प्रदर्शन भरवून आपली कला परदेशातही पोहोचविता येऊ शकते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नरेंद्र काटीकर यांनी केले. संस्थेच्या कार्याचा आढावा विठ्ठल मोरे यांनी घेतला.ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी मृदा दिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी गोपाळ डोंगे, नितीन जाधव, प्रकाश पोरे या कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभारप्रदर्शन रामचंद्र हक्के यांनी केले.
या चित्रकारांचा सन्मान
विकासनगर येथे घेण्यात आलेल्या कार्यशाळा व प्रदर्शनात जिल्ह्यातील प्रसिद्ध चित्रकारांनी सहभाग घेतला. यावेळी माजी प्राचार्य गोपाळ डोंगे, मीनाक्षी रामपुरे, रामचंद्र हक्के, डॉ. सुहास सरवदे, प्रकाश पोरे, देवेंद्र निंबर्गीकर, असिफ शिकलगार, सचिन गायकवाड, नितीन जाधव, प्रवीण रणदिवे, नितीन खिलारे, धनराज काळे या कलाकारांचा सत्कार आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.