पाच हजारांचा दंड, सव्हिस बुकात नोंद
अक्कलकोट : कर्नाटकातून अक्कलकोट येथे आलेल्या पाहुण्याकडून पोलिसांनी आठ हजार रुपये घेऊन पाचशे रुपयांचे पावती दिल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दखल घेऊन संबंधित घटनेचा चौकशी अहवाल मागवून घेतला. त्यावरून अधिकारी अन् दोन पोलिसांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड केला. याची सर्व्हिस बुकमध्ये नोंद झाली.
याप्रकरणी चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश एसपींनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांना दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
२४ एप्रिल रोजी कर्नाटकात अफझलपूर तालुका येथील मशाळ येथून काही पाहुणे मंडळी अक्कलकोट येथे कोरोनाने निधन झालेल्या एका व्यापारी कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते. भेटून परतताना अक्कलकोट बाह्यवळण रस्त्यावर वाहतूक पोलीस बशीर शेख यांनी त्यांच्याकडून आठ हजार रुपये घेऊन केवळ पाचशे रुपयांची पावती दिली होती. यासंबंधीचे वृत्त २६ एप्रिल रोजी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. यानंतर चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्या. त्यानुसार सपोनि महेश भावीकट्टी, चालक सहा. फौजदार सुतार, पोलीस अनिल चव्हाण यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड सुनावला. दंडाची रक्कम जरी कमी वाटत असले तरी आयुष्याच्या सर्व्हिस बुकात नोंद झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.