बार्शी : विवाहाच्या मुहूर्तावर आयोजित केलेल्या बांगड्या भरण्याच्या छोटेखानी कार्यक्रमात एका मुलीने नववधू मैत्रिणीच्या आईच्या पाया पडत नजर चुकवून दागिन्यांचा डबा पळविल्याचा प्रकार पुढे आला आहे.
पूनम अन्नदाते (रा. अलीपूर रोड बार्शी) असे संशयित आरोपी मुलीचे नाव असून याप्रकरणी नववधूची आई जयश्री शरद घाडगे (रा. हेडे गल्ली आझाद चौक) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार जयश्री घाडगे यांच्या मुलीचा विवाह असून नातेवाईक महिलांना घरी बांगड्या भरण्यासाठी बोलावले गेले होते. १७ जून रोजी सायंकाळी दरम्यान जयश्री यांच्या मुलीची मैत्रीण पूनम हीदेखील हौसेने बांगड्या भरण्यासाठी आली. तळमजल्यावर हा कार्यक्रम सुरू असताना जयश्री या वरच्या मजल्यावर गेल्या. कपाटातून दागिन्यांचा डबा बाहेर काढून त्यातील केवळ बांगड्या हातात घातल्या आणि डबा जवळ ठेवला. इतक्यात पूनम ही वरच्या मजल्यावर आली. जयश्री यांच्या पाया पडत नजर चुकवून तो दागिन्यांचा डबा पळविला.
या डब्यात दोन लाख ८० हजारांचे दागिने होते. या डब्यातून अंगठी, नेकलेस, कर्णफुले, नेकलेस व कानातील वेल, फुले, झुबे असे दोन लाख ८० हजारांचे दागिने पळविले.
काही वेळाने जयश्री या हातातील बांगड्या काढून पु्न्हा डब्यात घालण्यासाठी कपाटाजवळ गेल्या असता तेथून डबा गायब झाल्याचे निदर्शनास आले.