लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर: गेल्या आठ वर्षात एफआरपीनुसार ३४२ कोटी ३७ लाख इतकी रक्कम राज्यातील ४३ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकविले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आठ कारखान्यांकडे १२१ कोटी ४८ लाख रुपये शेतकऱ्यांचे अडकले आहेत. ही रक्कम बुडाल्यात जमा असल्याचे सध्याचे चित्र आहे.
२०१२-१३ पासून एक-एक करीत राज्यातील ४३ साखर कारखान्यांकडे वरचेवर एफआरपीची रक्कम थकली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक आठ साखर कारखान्यांनी गेल्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. २०१२-१३ पासून एफआरपीची रक्कम थकली असताना ती शेतकऱ्यांना मिळाली नाही व ती मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणा काही करू शकली नाही. मात्र या ४३ पैकी पाच साखर कारखान्यांनी थकलेल्यापैकी १२ कोटी ८५ हजार रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. या पाचसह उर्वरित ३८ साखर कारखान्यांकडे ३३० कोटी ३६ लाख रुपये अडकले आहेत.
थकबाकीत सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक आठ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे १२१ कोटी ४८ लाख रुपये थकीत आहेत. तर सोलापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडील उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी १५ कोटी ९७ लाख रुपये थकवले आहेत.
-----------
या कारखानाने थकवली रक्कम
- सोलापूर जिल्हा- गोकूळ-१६ लाख, आदिनाथ- २३४ लाख, सीताराम महाराज खर्डी- २५ कोटी ४८ लाख, सहकार शिरोमणी वसंतराव काळे- १२ कोटी ४४ लाख, स्वामी समर्थ अक्कलकोट- ९ कोटी ७ लाख, आर्यन बार्शी- २१ कोटी ५ लाख, विजय शुगर करकंब- २० कोटी १८ लाख, शंकर अकलूज- ३० कोटी ७७ लाख रुपये.
उस्मानाबाद जिल्हा- भीमाशंकर- १६० लाख, जय लक्ष्मी- ७६९ लाख, तेरणा- १०९ लाख, नरसिंह इंदापूर- ३५३ लाख, शंभू महादेव- २ कोटी ७ लाख रुपये.
- कोल्हापूर जिल्ह्यातील दौलत कारखाना १८ कोटी १२ लाख, आजरा शेतकरी १५ कोटी ४६ लाख, सांगली जिल्ह्यातील वसंतदादा शेतकरी ५ कोटी ५४ लाख, महाकाली ७ कोटी ९८ लाख, मानगंगा ३ कोटी ३३ लाख, पुणे जिल्ह्यातील केन ॲग्रो डोंगरी ८ कोटी ६६ लाख, यशवंत थेऊर १० कोटी ८४ लाख, सातारा जिल्ह्यातील रयत ९९५ लाख व न्यू फलटण २३ कोटी ६६ लाख रुपये.
- नाशिक जिल्ह्यातील के. के. वाघ २ कोटी ८५ लाख, के. जी. एस. ५२६ लाख, जालना जिल्ह्यातील समर्थ-१ कारखाना ३६५ लाख, समर्थ-२ कारखाना १९७ लाख, जय भवानी ७१२ लाख, व्ही.व्ही. पाटील ९६ लाख, जळगाव जिल्ह्यातील बेलगंगा १६ लाख, अंबाजी शुगर ३८६ लाख, चोपडा १५ कोटी ५८ लाख, मधुकर यावल १५ कोटी ८१ लाख,
नरसिंह लोहगाव (परभणी) २२१ लाख, महाराष्ट्र शेतकरी ४२२ लाख, पूर्णा ( हिंगोली) ११४ लाख, नांदेड जिल्ह्यातील एच.जे. पाटील ५५८ लाख, शंकर वागलवाडा १६ लाख, जय शिवशंकर १२९ लाख, लातूर जिल्ह्यातील शेतकरी किल्लारी ६२ लाख, पन्नगेश्वर ६६१ लाख व नागपूरच्या श्रीराम कारखान्याने ३८ लाख रुपये थकविले आहेत.