सोलापूर - देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असतानाही अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावाजवळून जाणाऱ्या हरणा नदीतील विदारक दृश्य मंगळवारी समोर आले. नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा घेऊन जातानाची मनाला चटका देणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली. बघता बघता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. तसेच, मरणानंतरही खडतर प्रवास करण्याची वेळ प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आल्याची लोकभावना व्यक्त झाली. आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेत सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फोन करुन तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील पितापूर या गावी जोरदार पावसामुळे नदी ओसंडून वाहत असताना पुलाअभावी गावातील एका मुस्लिम व्यक्तीचे प्रेत हे नदीला आलेल्या पुराच्या प्रचंड पाण्यातून कब्रस्तानकडे नेण्यात येत होते. त्यावेळी इतर लोकांचेदेखील जीव धोक्यात होते, तरीही केवळ नदीवर पूल नसल्याने या लोकांवर हा बाका प्रसंग उद्भवला. हा व्हिडिओ शिंदे गटाच्या युवासेना राज्य विस्तारक अविनाश खापेपाटील यांच्या पाहण्यात आली. त्यावेळी, त्यांनी लेखी अर्जाच्या माध्यमातून ही बाब तात्काळ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. अपेक्षेप्रमाणे फोन फॅक्टरसाठी ओळखल्या जाणाऱ्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी या पत्राची दखल घेत लागलीच सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना फोन फिरवला व सदर विषयाच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकारी यांना संबंधित प्रकाराची आवश्यक माहिती घेऊन अविनाश खापे यांच्याकडे निरोप द्यायला सांगितला. त्यानंतर अवघ्या तासाभरातच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन खापे यांना कॉल केला. त्यानुसार पितापूर या ठिकाणी नदीची खोली अधिक असल्याने सद्यस्थितीत तिथे लोखंडी पूल उभारणे शक्य नसल्याने लवकरच पक्का आणि काँक्रिट पूल उभा करण्यासाठी तात्काळ प्रशासकीय मान्यता घेऊन टेंडर प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी अविनाश खापे यांना दिली. या सदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन माहिती दिली.
पर्याय नसल्याने जीव धोक्यात घालून अंत्ययात्रा
अक्कलकोट तालुक्यात गेल्या 4-5 दिवसांपासून जोरदार पाऊस पडला आहे. या पावसामुळे हरणा नदीला मोठया प्रमाणात पाणी आले असून या पाण्यामुळे अनेक गावातील पाणी शिरले आहे. हरणा नदीच्या परिसरात पितापूर हे गाव आहे. या गावात मुस्लिम समाजातील एकाचे निधन झाले होते. गावातील मुस्लिम समाजाची स्मशानभूमी हरणा नदीच्या पलीकडे आहे. अंत्ययात्रा कशी घेऊन जायाची याबाबत ग्रामस्थांनी सुरूवातीला विविध उपाययोजना आखल्या. मात्र, पाण्यातून जाण्याशिवाय कोणताच पर्याय समोर आला नाही. शेवटी ग्रामस्थांनी थेट नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा नेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.