सोलापूर : एक महिन्यापूर्वी चारचाकी वाहनाचा सौदा करून एक लाख रुपये अॅडव्हान्स देऊन वाहन नेले, उर्वरित तीन लाख रुपये अद्याप मिळाले नसल्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार विठ्ठल दत्तात्रय मुनगापाटील (वय ३९, सृष्टीनगर, अक्कलकोट नगर, सोलापूर) या व्यावसायिकाने दिली. त्यानंतर, शिवेसना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यासह आकाश मुदगल या दोघांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिंदे गटानेही राज्यासह स्थानिक जिल्हा स्तरावर विविध पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. त्यामध्ये, शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुखपदी मनिष काळजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंच्या सोलापूर-पंढरपूर दौऱ्यात मनिष काळजे मुख्यमंत्र्यांसमवेत दिसून आले होते. आता, त्याच जिल्हाप्रमुखांकडून आपली आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रारी पोलिसांत करण्यात आली आहे.
फसवणूकीची ही घटना ४ जानेवारी ते आजतागायत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून गाडी घेऊन गेले. मात्र, १ लाख अॅडव्हान्स रक्कम दिल्यानंतर उर्वरीत रक्कम आजतागायत फिर्यादीस मिळाली नाही. याशिवाय फिर्यादीकडील वाहन स्वतःचे म्हणून वापरले. आपली आर्थिक फसवणूक करून दमदाटी केल्याचे तक्रारदाराने फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार, सोलापूरमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक व्ही. व्ही. कुकडे करीत आहेत